सरकारी रुग्णालयांसह खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणीची सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता दोन दिवसांत १०० नवे करोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याने ३२० रुग्णांचा आकडा पार केल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून अधोरेखित झाले आहे.

राज्यात २१ मार्चपासून दर दिवशी नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत आहे.  रुग्णांमध्ये अजून तरी २१ ते ५० वयोगटातील व्यक्तीची संख्या अधिक आहे. या अहवालानुसार, २५ टक्के लोकांना प्रवाशांच्या संपर्कातून करोनाची लागण झाली आहे. १२ टक्के बाधीतांच्या संसर्गाचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

राज्यात बुधवारपर्यत ४७५१ जणांच्या करोना चाचणी झाल्या असून यातील ४ टक्के करोनाबाधित आढळले आहेत. मृतांमध्ये ६१ ते ७० वयोगटातील सर्वाधिक आहेत.

राज्यात कोरोनाबाधित ३३ नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील ३०  रुग्ण मुंबईचे, पुणे येथील दोन तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात करोना मुळे तिघांचा मृत्यू झाला. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय ५० वर्षीय पुरुष पालघर येथे मरण पावला. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही.   आतापर्यंत  राज्यात करोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत.

राज्यात आज एकूण ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६४५६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४१ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

राज्यातील रुग्णांचा तपशील

* मुंबई    १८१

* पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ५०

* सांगली   २५

* मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ३६

* नागपूर १६

* यवतमाळ ४

* अहमदनगर   ८

* सातारा, कोल्हापूर प्रत्येकी   २

* औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी   १

* इतर राज्य — गुजरात      १

* एकूण  ३३५ त्यापैकी  ४१ जणांना घरी सोडले तर  १३ जणांचा मृत्यू