कामांचा आढावा घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचत नसलेल्या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बळकट करण्याच्या नावाखाली मोठमोठय़ा पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचा घाट पालिकेतील झारीच्या शुक्राचार्यानी घातल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संतापलेले पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सध्या मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याच्या कामात सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

२६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्याच वेळी दक्षिण मुंबईत सखल भाग वगळता अन्य परिसरात पाणी साचले नव्हते. असे असताना आता पाणी न साचणाऱ्या भागांमध्येही मोठमोठय़ा पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

कुलाबा, फ्लोरा फाऊंटन परिसरातील काही रस्त्यांची कामे पालिकेने सुरू केली आहेत. या भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत.

मुळात २६ जुलै रोजी अथवा गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर या भागात पाणी साचल्याचे आढळलेले आहे. असे असतानाही कोटय़वधी रुपये खर्च करून कुलाब्यातील ताज महल हॉटेल जवळील पी. रामचंदानी मार्ग, फ्लोरा फाऊंटन परिसरातील मुंबई उच्च न्यायालयाजवळील कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावर मोठय़ा पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुळात येथे पाणी साचत नसल्याने तेथे मोठी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याची गरज नाही. ही बाब मेहता यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले. गरज नसतानाही केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांना दिले.

दक्षिण मुंबईमध्ये सध्या ‘मेट्रो-३’ची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. त्यातच पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न दक्षिण मुंबईत निर्माण झाला आहे. त्याचा फटका पादचारी आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्ते दुरुस्ती रेंगाळली आहे.

पाणी तुंबत नसलेल्या ठिकाणी टाकण्यात येत असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. गरज नसेल तर तात्काळ पर्जन्य जलवाहिन्यांची कामे थांबविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या पैशांचा अपव्यय टाळता येईल.

– अजोय मेहता, साहाय्यक आयुक्त