मुंबई: अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच्या  लोकल प्रवासात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही धरपकड मध्य रेल्वेकडून के ली जात आहे. आतापर्यंत १५० ओळखपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये ८० टक्के  बनावट ओळखपत्र मुंबई पालिके च्या नावाने आहेत.

१५ जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मध्य रेल्वेतून सध्या दोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. लोकल अद्याप सर्व प्रवाशांसाठी खुली झालेली नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा येथून प्रवास करणाऱ्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रस्ते प्रवास करताना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने लोकल प्रवास के ला जात आहे. यासाठी बनावट ओळखपत्राचा आधारही घेतला जात आहे.  परंतु अशा प्रवाशांची रेल्वे तिकीट तपासनीस, रेल्वे पोलीसांकडून धरपकड करण्यात येत आहे. स्थानकात प्रवेशाआधी तिकीट, ओळखपत्राची तपासणी करतानाच बनावट ओळखपत्र बाळगल्याचे दिसताच त्यांना हुसकावून लावले जाते आणि ओळखपत्र जप्त के ले जात आहे. अशा तऱ्हेने १५० बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबई पालिके च्या नावाची १०० पेक्षा जास्त बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत.  अन्य पालिका, विविध रुग्णालयांच्या नावाने ओळखपत्र आहेत. खासगी कार्यालयात काम करणाऱ्यांबरोबरच छोटा व्यवसाय करणारे, घरकाम करणाऱ्या महिलाही आहेत. यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले की, बनावट ओळखपत्र घेऊन लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशावर कारवाई करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत वडाळा, दादर, ठाणे स्थानकात रेल्वे पोलिसांकडे एकू ण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. अशा प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात नाही.