लोकल ट्रेन ही मुंबईकरांसाठी लाइफलाइन. याच लाइफलाइमध्ये मोबाइल चोरीच्या दररोज किमान १०० घटना घडतात अशी माहिती समोर आली आहे. मोबाइल चोरीचे १०० गुन्हे रोज दाखल होतात अशी माहिती GRP नी दिली. प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीच्या किमान १० तक्रारी दाखल होतात. २०१७ या पूर्ण वर्षात १८ हजार मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. लोकल ट्रेनमधून मोबाइल चोरी होण्यासंदर्भातल्या याच तक्रारी आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. जे प्रवासी त्यांचा मोबाइल मिळण्याची आशाच सोडून देतात ते पोलिसात तक्रार द्यायला येत नाहीत. पोलिसात तक्रार न देणाऱ्या प्रवाशांचेही प्रमाण बरेच आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.

मोबाइल चोरी करण्यामध्ये १६ ते २५ वर्षे वयापर्यंतची मुले आघाडीवर आहेत अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकल स्थानकांमध्ये विदाऊट तिकिट चढणाऱ्या या भुरट्या चोरांवर आम्ही कारवाई करतो आहोत. खांबाच्या मागे उभे राहून प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकवायचा आणि पळ काढायचा ही पद्धत हे चोर सर्रास वापरताना दिसतात अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. मे २०१७ मध्ये आम्ही मोबाइल चोरीच्या १२६ तक्रारी नोंदवल्या. जून मध्ये हे प्रमाण १ हजार १८७ तक्रारींवर गेले. प्रवाशांच्या हातून मोबाइल हिसकावून पळ काढला की हे भुरटे चोर पळ काढतात. माहिम आणि बांद्रा या दोन स्थानकां दरम्यान चोऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचेही कराड यांनी सांगितले.

काही चोर ट्रॅकवर उभे राहूनही लोकलमधल्या प्रवाशांचे मोबाइल खेचतात.  ट्रॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे नसतात त्यामुळे आम्ही हे चोर नेमके कशा प्रकारे मोबाइल चोरून पळ काढतात हे सांगू शकत नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे. ट्रेनमध्ये मोबाइलवर सिनेमा किंवा चॅटिंग करणाऱ्यांचे प्रमाण भरपूर आहे. लक्ष नसताना मोबाइल खेचला जातो आणि मग प्रवाशावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते.  मात्र लोकल ट्रेनमध्येच मोबाइल चोरीला जाण्याची प्रकरणे वाढीला लागली आहेत असेही पोलिसांनी म्हटले आहे.