सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी आता सर्व अकृषी विद्यीपाठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून शुक्रवारी तसा आदेश जारी करण्यात आला.

१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निकाल जाहीर केला जाणार आहे. एकंदरीत कमी कालावधीत परीक्षा पार पाडणे व निकाल घोषित करणे हे आव्हानात्मक काम पार पाडण्यासाठी सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने म्हटले आहे.