अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून तयार होणाऱ्या हरित ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी नेहमीच्या वीजदरापेक्षा प्रति युनिट ६६ पैसे जादा दर देऊन आपली संपूर्ण वीजमागणी हरित ऊर्जेपासून भागवण्याचा पर्याय आता टाटा पॉवर, बेस्ट, अदानी आणि महावितरण या सर्व वीजवितरण कंपन्यांच्या सर्व ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे.

सध्या अनेक ठिकाणी हरित ऊर्जेचा पुरस्कार के ला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि अपारंपरिक स्रोतांपासून तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या हरित ऊर्जेचा पुरस्कार जगात-देशात सुरू आहे. भारताने व महाराष्ट्रानेही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे. आपली विजेची संपूर्ण गरज हरित ऊर्जेपासून भागवण्याची अनेक ग्राहकांची इच्छा असते. मात्र, त्या प्रमाणात अपारंपरिक ऊर्जेच्या खरेदीचे करार के लेले नसतात. त्यामुळे अतिरिक्त शुल्क लावून संपूर्ण हरित ऊर्जा वापरण्याची मुभा वीजग्राहकांना द्यावी, अशी याचिका टाटा पॉवरने राज्य वीज नियामक आयोगात दाखल केली होती. कर्नाटकात अशी मुभा यापूर्वीच देण्यात आली आहे, याकडेही वीज आयोगाचे लक्ष वेधण्यात आले.

त्यावर निर्णय देताना राज्य वीज नियामक आयोगाने महाराष्ट्रातील सर्वच वीज वितरण कं पन्यांना अतिरिक्त शुल्क आकारून १०० टक्के हरित ऊर्जा वापरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना तशी सेवा देण्याची परवानगी दिली. त्यासाठी वीज आयोगाने ६६ पैसे प्रति युनिट इतके  अतिरिक्त शुल्क निश्चित के ले आहे. म्हणजेच राज्यातील सर्व वीज गटातील वीजग्राहकांना आपल्या वीजवापरानुसार असणाऱ्या नेहमीच्या वीजदरापेक्षा प्रति युनिट ६६ पैसे जादा देऊन संपूर्ण हरित ऊर्जा वापरता येईल. ग्राहकांनी तशी नोंदणी केल्यानंतर संबंधित वीजवितरण कं पनी त्याबाबतची प्रक्रि या पार पाडेल.