कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक

राज्यात गेल्या चार महिन्यांत पावसाने १०० टक्के कामगिरी केली आहे. मात्र, हा पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडलेला नसून कोकण व मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४ टक्के अधिक तर विदर्भात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस पडला. देशभरात सरासरीच्या ९५ ते ९६ टक्के पाऊस झाला असून, मोसमी वाऱ्यांनी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

मोसमी वाऱ्यांनी राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असली तरी दक्षिण भारतात मोसमी वारे सक्रिय आहेत. मात्र, तांत्रिकदृष्टय़ा १ जून ते ३० सप्टेंबर हा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पावसाचा काळ समजला जातो. जागतिक हवामानाची मे महिन्यातील स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने पावसाच्या चार महिन्यांत महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात पाऊस १०० टक्के कामगिरी करेल, असा अंदाज जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर केला होता. तसेच देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ३० सप्टेंबपर्यंत देशभरात सरासरीच्या ९५ ते ९६ टक्के पाऊस पडल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पावसाने सरासरीएवढीच कामगिरी केली आहे. राज्यात दरवर्षी सरासरी १००७.३ मिलीमीटर पाऊस पडतो. या वेळी ३० सप्टेंबपर्यंत १००६.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोकणात सरासरीच्या १० टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात १७ टक्के अधिक तर मराठवाडय़ात ५ टक्के कमी व विदर्भात तब्बल २३ टक्के कमी पाऊस पडला. विदर्भातील नागपूर वगळता इतर सर्व जिल्ह्य़ांत पावसाने ओढ दिली. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया येथे ७० टक्केही पाऊस झाला नाही. मराठवाडय़ात परभणी, हिंगोली व नांदेड येथे ७० ते ८० टक्के पाऊस पडला.

राज्यात गेल्या वर्षी पावसाने सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक कामगिरी केली होती. त्याआधी २०१४ व २०१५ मध्ये राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती होती. या वेळीही मध्य भारतात १०० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. राज्यात १०० टक्के पाऊस पडला असला तरी गुजरातमध्ये सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक तर मध्य प्रदेशमध्ये २० टक्के कमी पाऊस पडला. देशाच्या उत्तर भागात या वेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

राज्यातील पावसाचे प्रमाण

’२०१७    १०० टक्के

’२०१६   १११ टक्के

’२०१५   ७५ टक्के

’२०१४   ८५ टक्के