मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; १०९ शिक्षकांचा गौरव

दोन वर्षांत राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एनसीपीए येथे झालेल्या राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. जनतेसोबत संवाद साधता यावा यासाठी केंद्रातील ‘भारत नेट’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र नेट’चा प्रयोग येत्या काळात सुरू क रण्यात येणार आहे. त्याद्वारे राज्यातील प्रत्येक खेडय़ातील लोकांपर्यंत आरोग्य आणि शिक्षणाच्या सेवा पोहोचवता येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत डिजीटल व अत्याधुनिक करण्यात येणार असून राज्यातील सर्व शाळा ‘ऑनलाईन डिजीटल’ करण्यात येणार आहेत. तसेच अपंग विद्याथ्र्र्यासाठी लवकरच अभ्यास मंडळ स्थापन करण्यात येईल. तसेच यावर्षी राज्यभरात ३३,००० प्रगत शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावर्षी आदर्श पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याने अनेक शिक्षकांनी या प्रक्रियेचे स्वागत केले. तसेच १० वीच्या नापास विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी लवकरच कौशल्य शिक्षण देण्यात येणार असून त्यासंबधी काही दिवसांतच संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सिंगापूर, फिनलँड देशातील शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी अनेक शिक्षक स्वखर्चाने तेथे जातात, मात्र ग्रामीण भागातील शिक्षकाला ते शक्य होत नाही, त्यामुळे या देशात कशा पद्धतीचे शिक्षण दिले जाते याची चित्रफीत ग्रामीण भागातील शिक्षकांना दाखवण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

यावेळी एकूण १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, १९ आदिवासी विभागातील प्राथमिक, २ कला /क्रीडा क्षेत्रातील, २ स्काऊड गाईड शिक्षक, १ अपंग शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आर्दश शिक्षिकांचा सामावेश आहे.  यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, आमदार अ‍ॅड. राहुल नार्वेकर, आमदार रामनाथ मोते, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार, शिक्षण आयुक्त धीरज कुमार  उपस्थित होते.

लाठीमाराची घटना लज्जास्पद

औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याची घटना राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. मात्र शिक्षकांनीही आपल्या मागण्या चर्चेद्वारे सोडवाव्यात व अशा घटना पुन्हा होऊ नये, याकडे लक्ष देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.