अभिजात संगीताची परंपरा अजूनही टिकून
गणेशोत्सवाचे १००वे वर्ष
नेहमीच घडय़ाळाच्या काटय़ावर चालणारी, कधीही न झोपणारी, सतत धावणारी असे मुंबापुरीचे वर्णन केले जात असले तरी या अजब शहराच्या एका कोपऱ्यात मात्र ताल-स्वरांचा उत्सव दररोजच रंगत असतो. हा कोपरा म्हणजे शास्त्री हॉल. शास्त्री हॉलचे रहिवासी गाण्याच्या लकेरीवरच जगतात, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नऊ चाळींच्या या वसाहतीत बहुसंख्य घरांत अभिजात संगीताची एक थोर परंपरा मोठय़ा निष्ठेने आणि डोळसपणे सांभाळली जात आहे. या वसाहतीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाचे यंदाचे १०० वे वर्ष आहे.
ग्रँट रोड स्थानकातून बाहेर पडताच पश्चिम दिशेला वर्दळीतून वाट काढत गेले की समोर नाना चौक दिसतो. तिथे जावजी दादाजी मार्गावर शास्त्री हॉलची भव्य कमान लागते. उंबरठा ओलांडून आत गेल्यावर पेशवे दरबारचे सरदार गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या नावे असलेली दक्षिण मुंबईतील सुमारे सव्वाशे वर्षे जुनी वसाहत पाहायला मिळते; परंतु शतकाचे वजन शास्त्री हॉल सहज पेलताना दिसते. अध्र्या किलोमीटरच्या या परिसरात पसरलेल्या टुमदार कौलारू चाळी शिस्तीने एका रांगेत उभ्या आहेत. इथली सुमारे ३००हून अधिक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे मुंबईच्या एका वैभवशाली परंपरेचा भाग आहेत. कारण इथली सगळी कुटुंबे सुरांच्या एकाच धाग्यात गेली कित्येक वर्षे गुंफली गेली आहेत.
शास्त्री हॉलने अनेक नामवंत गायिकांना घडविले आहे. गंधर्व पुरस्काराने गौरविलेल्या सुमतीबाई टिकेकर आणि त्यांच्या सून आरती अंकलीकर-टिकेकर, उत्तरा केळकर ही काही प्रमुख नावे. शास्त्री हॉलचा हा सगळा परिसर संगीतमय आहे आणि याला कारण इथली परंपरा, असे सुमतीबाईंची मुलगी आणि ज्येष्ठ गायिका व संस्कृतच्या व्यासंगी उषा देशपांडे सांगतात. ‘येथे लहानपणीच मुलांवर गाण्याचे संस्कार केले जातात. हा इथल्या जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच ताला-सुराचे ज्ञान मिळत जाते,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. विख्यात गायक पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रोक्त संगीताचे धडे घेतले आहेत.
‘आई रियाझ करत असताना तिच्या एका मांडीवर तंबोरा असायचा आणि दुसऱ्या मांडीवर माझे डोके. लहानपणापासूनच तिचे गाणे माझ्या मनात असे झिरपत गेले आणि संगीताची गोडी वाढत गेली,’ अशा शब्दांत उषा देशपांडे यांचे चिरंजीव हृषीकेश यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
‘भारतीय अभिजात संगीताच्या जगात ज्यांच्या असामान्य तपश्चर्येमुळे गायनप्रतिभेला झळाळी मिळाली आहे, असे पं. भास्करबुवा बखले, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं मल्लिकार्जुन मन्सूर, बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, माणिक वर्मा, पं. राम मराठे, पं. हृदयनाथ मंगेशकर या आणि अशा असंख्य दिग्गजांनी शास्त्री हॉलमध्ये मफिली रंगवल्या आहेत,’ असे शास्त्री हॉल सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विनय अंतरकर यांनी सांगितले.
येथे माणूसपणाचीही मूल्ये
अभिजात संगीतातल्या ऋषींनी केलेल्या तपामुळे शास्त्री हॉलची जमीन इतकी पक्की झाली आहे की इथल्या मातीतही सूर आहे. शास्त्रीय संगीताचे संस्कार लहानपणासूनच इथे होत असल्याने ताल-स्वर कळण्यासोबतच ‘चांगला माणूस’ होण्यासाठी आवश्यक ती मूल्ये इथे रुजली जातात. प्रत्येक कलाकाराला हवे असणारे सुरक्षित वातावरण त्याला इथे मिळते. त्यामुळे आपल्या हातून चांगलेच काम होणार, असा विश्वास प्रत्येक कलाकाराला वाटतो.
– आरती अंकलीकर टिकेकर,     सुप्रसिद्ध गायिका
पुढची पिढीही तयार
सुरांची ही परंपरा पुढे नेण्याचे काम आसावरी फडके, दीप्ती नामजोशी, विद्या करलगीकर, मुग्धा दीक्षित, सायली तळवलकर अशा नव्या दमाच्या गायिका समर्थपणे करत असल्याचे उषाताईंच्या कन्या राधिका देशपांडे यांनी सांगितले. याशिवाय तन्वी अंतरकर, अथर्व अभ्यंकर आणि सोहम फडके ही बच्चे कंपनीसुद्धा संगीत आणि नृत्यांत प्रावीण्य मिळवत आहे. गणेशोत्सवात लहानग्यांच्या कार्यक्रमाला रहिवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतो असे राधिका यांनी आवर्जून नमूद केले. दुसरीकडे आधुनिकतेची कास धरत गणेश आचवल हा तरुण सध्या रेडिओ जॉकीचे काम करून शास्त्री हॉलच्या संस्कृतीला नवे परिमाण देत आहे.
रोडेबाईंची परंपरा
शास्त्री हॉलमधील लहान मुलांचे संगीताचे धडे बडबडगीतांनी
सुरू होतात. ही परंपरा येथील ‘रोडेबाई’ यांची देणगी आहे.
त्यामुळे  शास्त्री हॉलवासीयांच्या मनात त्यांच्याविषयी खूप
जिव्हाळा आहे. ‘वयाच्या पाचव्या वर्षी शास्त्री हॉलमधील चिमुरडय़ांना बडबड गीतांपासून ते अगदी अक्षरांची ओळख करून देण्यापर्यंतचे महत्त्वपूर्ण काम रोडेबाईंनी निरपेक्ष बुद्धीने शेवटपर्यंत अविरत केले,’ अशा शब्दांत प्रमोद लेले यांनी रोडेबाईंविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान