परिसरातील साऱ्या बैठय़ा चाळी आणि इमारतींनी कालाय तस्मै नम: म्हणत टॉवरची उंची गाठण्यास सुरूवात केली असली तरी कल्याणमध्ये लाल चौकी या मोक्याच्या परिसरात आग्रारोड लगतच्या एका चाळीने आपले गोजिरवाणे ‘घर’पण कसोशीने जपले आहे. मागे-पुढे अंगण, तुळशी वृंदावन, विहीर असा जुन्या जमान्यातील थाट कायम ठेवणाऱ्या या घराचे यंदा शताब्दी वर्ष असून गेल्या पाच पिढय़ांपासून या घरात नांदणाऱ्या केळकर कुटुंबीयांनी यासाठी जंगी तयारी चालवली आहे.
एका सदनाची गोष्ट..
आग्रा रोडवरील केळकर सदनची कथा अतिशय रंजक आहे. येथे असणाऱ्या मूळच्या फडके चाळीतील एका खोलीत १९१५ मध्ये विठ्ठल केशव केळकर हे गृहस्थ महिना चार रूपये भाडय़ाने रहावयास आले. आता केळकर सदनाचे कुटुंबप्रमुख असणाऱ्या श्रीधर केळकर यांचे ते आजोबा. फडकेंनी ही चाळ १९३० मध्ये ठाण्यातील साठेंना विकली. नंतर ती मालमत्ता त्यांनी जावई आठवले यांना दिली.
दरम्यान श्रीधर केळकरांचे वडिल गोविंद केळकर आठवलेंचे व्यवस्थापक म्हणून इतर बिऱ्हाडांकडून भाडे वसुलीचे काम करीत होते. त्यामुळे १९५० मध्ये ही मालमत्ता विकताना केळकर कुटुंबियांचे हे घर त्यातून वगळण्याचा निर्णय आठवलेंनी घेतला. त्या काळात या सर्व मालमत्तेची किंमत ४० हजार रूपये होती. केळकर कुटुंबाकडे त्यातील एक पंचमांश जागा असल्याने ते आठ हजार रूपये देणे लागत होते. श्रीधर केळकरांचे वडिल गोविंद आणि काका अनंत केळकर यांनी घरातील सर्व सोने विकले. तेव्हा सोन्याचा भाव ऐशी रूपये तोळे होता. घरातील सर्व किंमती ऐवज विकुनही अवघे २२०० रूपये जमा झाले. त्यामुळे जागा घेण्यास असमर्थ असल्याचे केळकर बंधूंनी आठवलेंना कळविले. मात्र आठवलेंनी ‘उर्वरित रक्कम तुम्हाला जमेल तेव्हा द्या’ असे सांगत तेवढय़ाच पैशात केळकरांच्या नावावर घर केले. ही रक्कम केळकरांनी पुढील दहा वर्षांत फेडली.
आता घराला सांभाळणार
आता सहा दशकांनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तेव्हा कल्याण गावाच्या बाहेर असणारी ही वास्तू आता शहरात मोक्याच्या जागी आहे. त्यावेळी काही हजारात घेतलेल्या या घराची किंमत आता कोटींमध्ये आहे. मात्र ज्या घराने आपल्या पाच पिढय़ा सांभाळल्या ते घर पुढील पाच पिढय़ा जपण्याचा निर्धार श्रीधर केळकर यांनी केला आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचेही त्यास अनुमोदन आहे. केळकर दाम्पत्य, त्यांची दोन्ही मुले, सुना, नातवंडे असे नऊ जणांचे एकत्र कुटुंब या घरात नांदते.
घरातच कलादालन
चित्रकार असणाऱ्या श्रीधर केळकरांनी घरात त्यांच्या कलाकृती मांडल्या आहेत. त्यामुळे केळकर सदनात  फिरताना एखाद्या कला दालनात फेरफटका मारल्यासारखे वाटते.
घराचा वाढदिवस घरातच..
आता लग्न, मुंज, वाढदिवस बाहेर हॉल घेऊन साजरे केले जात असले तरी घराचा वाढदिवस घरातच साजरा करण्याचा निर्णय केळकरांनी घेतला आहे. एकाच वेळी जास्त पाहुणे आले तर व्यवस्था होणार नाही म्हणून  टप्प्याटप्प्याने पाहुणचार करण्यात येत आहे.