शाहू महाराजांच्या कर्मभूमीत पुन्हा सामाजिक अभिसरणाची पायाभरणी

मुंबई :  छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २० व २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेचा शताब्दी महोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या कर्मभूमीत पुन्हा एकदा सामाजिक अभिसरणाची पायाभरणी करण्याचा मानस असल्याचा संदेश आघाडी सरकारला द्यायचा आहे, असे सांगिले जाते. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत येत्या २१ मार्चला माणगाव परिषद शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २० व २१ मार्च १९२० रोजी अस्पृश्यांची परिषद झाली होती. या परिषदेला शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक जीवनाची ती सुरुवात होती. त्याच परिषदेत शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकरांसारखा उच्चविद्याविभूषित पुढारी बहुजन समाजाला मिळाल्याचे उद्गार काढले होते. या ऐतिहासिक परिषदेच्या शताब्दी निमित्ताने राज्यात पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात 

तत्कालीन कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २० व २१ मार्च १९२० रोजी अस्पृश्यांची परिषद झाली होती. या परिषदेला शाहू महाराज  उपस्थित होते. विशेष म्हणजे ही अस्पृश्यांची परिषद होती, तरी तिच्या आयोजनात माणगावमधील सर्व समाजातील लोकांचा सहभाग होता. त्या अर्थाने त्या परिषदेत सामाजिक अभिसरणाची पायाभरणी केल्याचे मानले जाते.