07 March 2021

News Flash

राज्यात चोवीस तासांत १० हजार रुग्णवाढ

पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ३९,३५३ रुग्ण उपचाराधीन आहेत. 

संग्रहित छायाचित्र

विविध शहरगावांत कठोर टाळेबंदीचे नियम आणि वेगवेगळे जाचक नियम लादूनही राज्यातील करोना रुग्णवाढ कमी होत नसल्याचे दिसत आहे. राज्यात दिवसभरात प्रथमच रुग्णसंख्येचा १० हजारांचा टप्पा पार झाला.

गेल्या २४ तासांत राज्यात १०,५७६ नवे रुग्ण आढळले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात २८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमारे साडेपाच हजार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ३९,३५३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३७ हजार ७२४ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १२ लाखांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. २४ तासांत २८ हजार ४७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशात आतापर्यंत ७.५ लाख रुग्ण बरे झाले असून, रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. अजूनही ४ लाखांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. दिल्लीमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८४.८३ टक्के आहे.

मुंबई सावरतेय..

मुंबई: मुंबईमध्ये बुधवारी एका दिवसात नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. १ हजार ३१० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार ५६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

दक्षिणेकडील राज्यांत मोठी रुग्णवाढ

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणाऱ्या केरळमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. तमिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये दिवसभरात सुमारे ५ हजार रुग्णांची वाढ झाली. कर्नाटकातही साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये करोनाचे संकट चिंतेची बाब ठरू लागली आहे.

दिल्लीत २४ तासांत १३०० रुग्ण वाढले. देशातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.४१ टक्के असून, महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण ३.८ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:22 am

Web Title: 10000 patients in 24 hours in the state abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमेरिकी उद्योगांना मोदींचे निमंत्रण
2 लडाखमध्ये हवाई दलाच्या तैनातीने चीनला योग्य संदेश
3 उदयनराजेंना उपराष्ट्रपतींकडून समज
Just Now!
X