छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नवा विक्रम

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने एका आगळ्या-वेगळ्या विक्रमाची नोंद मंगळवारी केली. २४ तासांत या विमानतळावरून १,००३  विमान फेऱ्या (उड्डाण आणि आगमन) हाताळण्यात आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या या विमानतळावर एकच धावपट्टी असून एवढय़ा मोठय़ा संख्येने उड्डाणे आणि उतरणारी विमाने हाताळण्यात आल्याची माहिती जीव्हीके मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडून सांगण्यात आले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दर तासाला ४२ ते ४८ विमाने उतरतात आणि उड्डाण करतात. २४ तासांत त्याची संख्या ९५० पर्यंत जाते. मात्र गेल्या काही महिन्यांत या धावपट्टीवर उतरणाऱ्या आणि उड्डाण करणाऱ्या विमान फेऱ्यांचे परिचालन वाढत आहे. मे २०१८ मध्ये ९८८ विमान फेऱ्या हाताळण्यात आल्या होत्या. तर फेब्रुवारीत ९८० विमान फेऱ्या हाताळल्या गेल्या होत्या. हाच विक्रम मोडून आता १,००३ विमान फेऱ्या हाताळण्यात आल्याचे सांगितले.

सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २४ तासांत ही विमाने हाताळली गेली आहेत. सोमवारी मुंबईत मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जवळपास २५ विमान फेऱ्या तर अन्य मार्गे वळविण्यात आल्या होत्या. या फेऱ्या सोमवारी मध्यरात्रीनंतरच्या २४ तासांत पुन्हा मुंबईत आल्या. त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी अधिक विमान सेवाही चालविण्यात आल्या. त्यामुळेच त्याची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले. एकाच धावपट्टीवरून मोठय़ा संख्येने विमान फेऱ्या हाताळणारे मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यग्र असे विमानतळ आहे. २४ तासांत हाताळण्यात आलेल्या एक हजार विमान फेऱ्यांमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

एकच धावपट्टी असूनही.

सध्या दिल्ली विमानतळावरूनही प्रत्येक दिवशी साधारण एक हजार विमान फेऱ्या हाताळल्या जातात. मात्र या विमानतळावर तीन धावपट्टय़ा आहेत. त्यामुळे दिल्ली विमानतळावरून मोठय़ा संख्येने विमान फेऱ्या हाताळण्याची क्षमता आहे. मात्र मुंबई विमानतळावर एकच मुख्य धावपट्टी आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

२४ तासांतील विमानांचे आगमन

  • राष्ट्रीय : ३७७
  • आंतरराष्ट्रीय : १२९
  • २४ तासांतील विमानांचे उड्डाण
  • राष्ट्रीय : ३६७
  • आंतरराष्ट्रीय : १३०