महामंडळाचा सेवा समाप्तीचा निर्णय कायम; आजपासून प्रतीक्षा यादीवरील ५०३ उमेदवारांचे प्रशिक्षण

मुंबई : वेतनवाढीसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या अघोषित संपात सामील झाल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाने रोजंदारीवरील १,०१० कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली होती. या कर्मचाऱ्यांना दिलासा न देता त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्यात येत असून सोमवारी ५०३ उमेदवारांना चालक तथा वाहक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. उर्वरित जागा भरण्यासाठीही एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत.

वेतनवाढीच्या मुद्दय़ावरून ८ आणि ९ जून २०१८ रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला होता. एसटी महामंडळाचा महसूलही बुडाला. त्यामुळे महामंडळाने संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. संपात रोजंदारीवरील १,०१० कर्मचारीही सहभागी झाल्याचे समोर आले.

एसटी महामंडळाने २०१७ मध्ये कोकणातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ७,९२९ चालक तथा वाहकपदासह साहाय्यक, लिपिक आणि पर्यवेक्षक इत्यादी सुमारे १४ हजार पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली होती. त्यापैकी नऊ हजार उमेदवार विविध पदांवर प्रशिक्षणांती नियुक्त झाले. यातील काही उमेदवारांचे प्रशिक्षणही सुरू आहे. मात्र सन २०१२ ते २०१६ च्या नवीन वेतन कराराशी त्यांचा काहीएक संबंधही नसतानाही १,०१० रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या अघोषित संपात सहभाग घेतला.  गैरहजर राहिल्याने महसूलही बुडाला. या कारणावरून एसटी महामंडळाने संपात सामील असलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई सुरू केली आणि प्रतीक्षा यादीवरील नवीन उमेदवार एसटीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सोमवारपासून प्रतीक्षा यादीवरील प्रथम ५०३ उमेदवारांना चालक तथा वाहक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. तसेच याच भरतीमधील जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन कागदपत्रातील किरकोळ त्रुटीमुळे भरती प्रक्रियेतून बाद झाले होते, त्यांना कागदपत्र पुन्हा सादर करण्यास सांगून त्यापैकी पात्र उमेदवारांना वाहन चाचणीसाठी पुन्हा बोलावण्यात आल्याचे सांगितले. याचबरोबर लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन वाहन चाचणीत मात्र अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही पुन्हा वाहनचालक चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेतून १,५०० चालक तथा वाहक मिळतील, अशी आशा एसटी महामंडळाला आहे. मात्र रोजंदारीवरील सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.