‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’विरोधात महाराष्ट्र सायबरने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’अंतर्गत राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांत १०२ गुन्हे नोंद झाले असून ३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबरने संबंधित एकूण १६०० प्रकरणांचा तपास करून ती पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यांना पाठवली होती.

अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) या संस्थेने भारतातून लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची छायाचित्रे, ध्वनीचित्रफीती फेसबूकसह अन्य समाजमाध्यमांवरून प्रसारित झालेले आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तांत्रिक तपशील(टीपलाइन) राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाला(एनसीआरबी) दिले होते. अलीकडेच एनमॅक आणि एनसीआरबीत चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित माहितीची देवाण-घेवाणीबाबत करार झाला होता. एनसीआरबीने महाराष्ट्रातील सुमारे १७०० प्रकरणे(टीपलाइन) महाराष्ट्र सायबरकडे सुपूर्द केली. या प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करून महाराष्ट्र सायबरने तांत्रिक माहितीआधारे ध्वनिचित्रफीत, छायाचित्रे प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली आणि आवश्यक ते पुरावे गोळा केले. हे पुरावे पुढील पोलीस ठाण्यांना कारवाईसाठी वर्ग केले.

या पुराव्यांआधारे आतापर्यंत शनिवापर्यंत राज्यात १०२ गुन्हे नोंद करण्यात आले तर ३६ जणांना अटक करण्यात आली. अटक आरोपींमध्ये काही अल्पवयीन तरुणांचाही समावेश आहे.

मुंबईत सर्वाधिक प्रकरणे ‘एनमॅक’ने पुरवलेल्या १६८० टीपलाइनपैकी सर्वाधिक ६५३ प्रकरणे मुंबई, ५४३ प्रकरणे पुणे(शहर) आणि ठाण्यातील(शहर) आहेत. ही माहिती पुरवण्यात आल्यानंतर मुंबईत १, पुण्यात २ गुन्हे नोंद झाले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये १२, नागपूरमध्ये ९ तर औरंगाबादमध्ये ८ गुन्हे नोंद आहेत.