साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास; मलेरिया, लेप्टो, स्वाइन फ्लूच्या रुग्णांतही वाढ

सुमारे १५ दिवसांपूर्वी अवघ्या मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली असताना, आता साथीच्या आजारांनी मुंबईकरांना छळायला सुरुवात केली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने या पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या ११ दिवसांतच मुंबईत डेंग्यूच्या १०२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मलेरियासह अन्य आजारांनी ग्रासलेल्या ५००हून अधिक रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे.

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत हाहाकार उडवल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. परंतु, पावसामुळे खड्डय़ांत साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने त्यावर डेंग्यूच्या अळय़ांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मुंबईत डेंग्यूचे २९३ रुग्ण आढळून आले असून केवळ सप्टेंबरच्या पहिल्या ११ दिवसात १०२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूमुळे दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. याव्यतिरिक्त मलेरिया आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात १०४८ मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते व एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या ११ दिवसात मलेरियाचे २७१ रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यू व मलेरियाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून कारवाई करण्यात येते. ऑगस्ट महिन्यात भायखळा, वरळी, जोगेश्वरी, जुहू, कुर्ला, भांडूप या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. तर लालबाग, धारावी, माहीम, कांदिवली या परिसरात मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते. याबाबत कीटकनाशक विभागाने या परिसरातील घराच्या भेटी घेऊन तपासणी करण्यात आली होती. बांधकामाची ठिकाणे, तरण तलाव, घरातील कुंडय़ांखाली ठेवलेले भांडे यामध्ये पाणी साचून राहते, यासाठी वेळोवेळी यातील पाणी बदलावे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते.

डेंग्यूची लक्षणे

’ प्रौढ व्यक्तींमध्ये तीव्र स्वरूपाचा ताप येणे, डोळे चुरचुरणे, डोके व अंगदुखी, अशक्तपणा, अंगवार लाल रंगाचे चट्टे येणे, मळमळणे व उलटय़ा होणे, त्वचेवर व्रण उठणे, अंगावर पुरळ उठणे.

’ अनेकदा डेंग्यूमध्ये हिरडय़ांमधून रक्त जाते. त्याशिवाय पोटात व छातीत पाणी जमा होणे, रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे यांसारखी लक्षणेही दिसतात.

रुग्णांची संख्या

’ मलेरिया – २७१

’ गॅस्ट्रो -२००

’ डेंग्यू – १०२

’ कावीळ – ५०

’ लेप्टो – २४

’ स्वाइन फ्लू २०

’ कॉलरा – १

(११ सप्टेंबपर्यंतची आकडेवारी)