‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’च्या उपयुक्ततेबाबत संभ्रम कायम

मुंबई : शहरातील १७६ करोनाबाधित डॉक्टरांपैकी १०२ डॉक्टरांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे प्रतिबंधक औषध घेऊनही संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. परंतु त्यांच्यापैकी बहुतांश डॉक्टरांमध्ये लक्षणांची तीव्रता मात्र कमी असल्याचे आढळले आहे.

असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या (एएमसी) प्राथमिक पाहणीमध्ये संसर्गाची तीव्रता कमी करण्यास हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (एचसीक्यू) हे औषध उपयोगी असल्याचे आढळले आहे. मात्र याबाबत अद्याप ठोस निष्कर्ष काढणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  ‘एएमसी’च्या ऑनलाईन सर्वेक्षणात करोनाबाधित १७६ डॉक्टर सहभागी झाले होते. त्यापैकी ४० टक्के ३६ ते ५० वयोगटातील आहेत. बहुतांश डॉक्टरांना ताप, अंगदुखी, थकवा, खोकला अशी सौम्य लक्षणे होती. त्यापैकी सुमारे ३८ टक्के डॉक्टर घरीच विलगीकरणात राहून करोनामुक्त झाले. १७ टक्के डॉक्टरांना श्वास घेण्यास त्रास झाला होता आणि ११ टक्के डॉक्टरांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. या डॉक्टरांपैकी ६७ टक्के डॉक्टरांनी प्रतिबंधात्मक औषधे घेतली होती. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १०२ डॉक्टरांनी एचसीक्यू घेतले होते, तर २७ टक्के होमियोपॅथी आणि ५३ टक्के जणांनी जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या होत्या, असे या सर्वेक्षणात आढळले.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८४ टक्के डॉक्टरांनी बीसीजी आणि ५६ टक्के डॉक्टरांनी ‘एमएमआर’ लस घेतली होती. तसेच अ रक्तगटाच्या लोकांना करोना संसर्गाचा धोका अधिक नसल्याचेही सर्वेक्षणात आढळलेले नाही, असे

करोनाबाधित डॉक्टरांमध्ये ६७ टक्के पुरुष आणि ३२ टक्के महिला होत्या. सरकारी सेवेतील २० टक्के डॉक्टर या ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले नव्हते.

डॉक्टरांना संसर्ग कशामुळे?

खासगी दवाखाने, रुग्णालयांमध्ये सेवा देताना यातील ८० टक्के डॉक्टर बाधित झाले. बहुतांश डॉक्टरांना संसर्गाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र उपचारांसाठी आलेले रुग्ण किंवा नातेवाईकांनी मास्क न घातल्याने संसर्ग झाल्याचे ३० टक्के डॉक्टरांचे मत आहे, असे ‘एएमसी’चे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.

धोकेच जास्त- डॉ. तोरस्कर 

उपचारांमधून हे औषध वगळले आहे. परंतु प्रतिबंधात्मक उपायांमध्ये ‘एचसीक्यू’चा समावेश आहे. हे औषध लाभदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र काही सामाजिक अभ्यासांमध्ये उपयोगी असल्याचे दिसून येते. परंतु त्याच्या उपयुक्ततेपेक्षा धोकेच जास्त आहेत. विशेषकरून ज्येष्ठ नागरिक, हृदयविकाराचे रुग्ण यांनी ते घेऊ नये असा सल्ला दिला जातो. त्यामुळे ठोस निष्कर्षांसाठी सामाजिक अभ्यास होणे आवश्यक आहे, असे विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले.

व्यापक अभ्यासाची गरज- डॉ. सुपे

संसर्ग प्रतिबंधक औषध म्हणून ‘एचसीक्यू’ उपयुक्त नसल्याचे अनेक वैद्यकीय अभ्यासांतून स्पष्ट झाले असले तरी काही अभ्यासांमधून ते रोगप्रतिकार क्षमता वाढवत असल्याने संसर्गाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याचेही अधोरेखित झाले आहे. त्यामुळे हे औषध संसर्ग रोखू शकले नाही तरी, ते त्याची तीव्रता कमी करण्यात लाभदायक आहे, का याबाबत अधिक मोठय़ा स्तरावर अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.