मुंबईकरांच्या मनाला धडकी भरवणारी ही बातमी आहे. एकाच दिवसात मुंबईत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल १०३ ने वाढली आहे. त्यामुळे एकट्या मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आता ४३३ वर गेली आहे.

मुंबई महापालिकेने रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत जमा झालेल्या आकडेवारीची माहितीचे पत्रक दुपारी ४ वाजता जारी केले. त्यानुसार एकूण ७२ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. शिवाय ३१ मार्च ते २ मार्च या काळात घेतलेल्या एकूण नमुन्यांपैकी ५५ जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत.

शिवाय आजच्यापैकी ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. आज मुंबईत एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या ३५७७ वर पोहोचली
देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली. एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये यात ५०५ रुग्णांची भर पडली आहे.