दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबईमधील तब्बल १० हजार ३२० इमारती टाळेबंद करण्यात आल्या असून प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही ६९४ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात मुंबईतील २,१६३ जणांना करोनाची बाधा झाली, तर ५४ जणांचा मृत्यू झाला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या पालिकेसाठी डोकेदुखी बनत आहे.

गणेशोत्सवानंतर झालेली गर्दी आणि त्यानंतर पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवून करोनाबाधितांचा सुरू केलेला शोध यामुळे सातत्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आजघडीला मुंबईतील करोनाबाधितांची संख्या एक लाख ९२ हजार ३०१ वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या आठ हजार ६५५ झाली आहे. गुरुवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३९ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश असून यापैकी ३८ जणांना दीर्घकालीन आजार होते.

गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत दाखल असलेले १,५५० रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत एक लाख ५५ हजार ६३८ रुग्ण करोनाबाधित झाले आहेत. काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ सरासरी ६१ दिवसांवर पोहोचला आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये २७ हजार ६१८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाबाधित रुग्ण सापडणाऱ्या इमारती टाळेबंद करण्याच्या धोरणात पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी बदल केले आहेत. आता एखाद्या इमारतीत १०पेक्षा अधिक रुग्ण आढळले किंवा दोनपेक्षा अधिक मजल्यांवरील रहिवाशांना करोनाची बाधा झाल्यास संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याच्या सुधारणा धोरणात करण्यात आली आहे. त्यानुसार आता इमारती टाळेबंद करण्यास सुरुवात झाली आहे. इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण सापडू लागल्यामुळे टाळेबंद केलेल्या इमारतींची संख्या तब्बल १० हजार ३२० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या १४ हजार ७४९ अतिजोखमीच्या, तर दोन हजार २२९ कमी जोखमीच्या गटातील व्यक्तींचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १,७४९ नवे रुग्ण

*  जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार ७४९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख ६५ हजार ३४३ इतकी झाली आहे. दिवसभरात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ४ हजार २६९ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वाधिक ४८१, ठाणे शहरातील ३८९, नवी मुंबईतील ३२५, मीरा-भाईंदर शहरातील २१६, ठाणे ग्रामीणमधील १२५, उल्हासनगर शहरातील ६९, बदलापूर शहरातील ६८, अंबरनाथ शहरातील ५० आणि भिवंडीतील २६ रुग्णांचा समावेश आहे.

* मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील १०, ठाणे शहरातील ८, मीरा-भाईंदरमधील ६, नवी मुंबईतील ५, उल्हासनगरमधील ३, भिवंडीतील २ आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे.