गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे. रविवारी १०५१ नवीन रुग्ण आढळले, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ९,७१५ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोनामुक्त रुग्णांचा दरही ९४ टक्क्यांवर ९३ टक्क्यांवर घसरला आहे.

रविवारी १०५१ आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३,२५,९१५ झाली आहे. एका दिवसात ८२७ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत ३,०३,८६० म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली असून सध्या ९७१५ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सुमारे ६१६६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर सुमारे २९७९ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही वाढली असून सध्या ३५१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. शनिवारी २१,९०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी पाच टक्क्य़ांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. दिवसभरातील चाचण्यांपैकी ६३०० प्रतिजन चाचण्या आहेत. आतापर्यंत ३२ लाख ७५ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रविवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४ पुरुष व १ महिला होती. सर्वाचे वय ६० वर्षांवर होते. मृतांची एकूण संख्या ११,४७० वर गेली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२८ टक्के झाला असून रुग्णदुपटीचा कालावधीही २४५ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.