राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107  नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 043 वर पोहचला आहे.या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे.

याचबरोबर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

तर, दुसरीकडे देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. १५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आत्तापर्यंत देशभरात करोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेसोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.