News Flash

‘सीबीएसई’ दहावीची परीक्षा रद्द

करोनामुळे बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय

‘करोनापूर्व काळा’तील संग्रहित छायाचित्र

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा लांबणीवर टाकली. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वेगळ्या पर्यायांचा अवलंब करण्यात येणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे ते १४ जून या कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. मूल्यमापनाच्या निकषांमध्ये काही बदल करून दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील. त्यानुसार करण्यात आलेले मूल्यमापन विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधीही देण्यात येईल. याबाबत सविस्तर सूचना देण्यात येतील, असे मंडळाने जाहीर केले आहे.

मंडळाने बारावीची परीक्षा लांबणीवर टाकली आहे. त्याबाबत १ जून रोजी आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना नव्या वेळापत्रकाची पूर्वकल्पना किमान १५ दिवस आधी देण्यात येणार आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पालक संघटना, सामाजिक संघटनांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर परीक्षा घेण्यात येतील, असे दोन

दिवसांपूर्वी ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी घेतलेल्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंडळाच्या परीक्षा होणारच

राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे-जूनमध्ये घेणार असल्याचे शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले. आता ‘सीबीएसई’प्रमाणेच राज्यानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र राज्यातील परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार?

गेले वर्षभर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचेही शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. अनेक ठिकाणी हे वर्ग जेमतेम झाले आहेत. राज्य मंडळाशी संलग्न  शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना वर्षानुवर्षे वार्षिक लेखी परीक्षेवरच भर दिला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांची सहामाही, सराव परीक्षा, चाचण्या घेण्यात येत असल्या तरी त्याचे मूल्यांकन ग्राह््य धरले जात नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थीही वार्षिक परीक्षेइतक्या गांभीर्याने त्याकडे पाहात नाहीत. यंदा बहुतेक शाळांनी अंतर्गत परीक्षाही घेतल्या नाहीत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. त्यामुळे लेखी परीक्षांना पर्याय म्हणून अंतर्गत गुण, प्रकल्प असे पर्याय असू शकतील. मात्र राज्य मंडळाच्या शाळांची दहावीची परीक्षा रद्द करायची झाल्यास विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘अंतर्गत गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. विद्यार्थ्यांवरही तो एकप्रकारे अन्यायच आहे. त्यांना स्वत:चे कौशल्य सिद्ध करता येईल, अशी त्यांच्या शालेय शिक्षणाच्या कालावधीत ही पहिलीच परीक्षा होते. अंतर्गत मूल्यमापन करावे, शाळेतच परीक्षा घ्याव्यात असे पर्याय सुचवणारी सर्वेक्षणे सातत्याने समोर येत आहेत. मात्र त्यांची विश्वासार्हता किती हेसुद्धा पाहिले पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:38 am

Web Title: 10th exam cancelled cbse decision abn 97
Next Stories
1 संचारबंदीतून गृहसेविकांना सूट
2 अनिल देशमुख यांची नऊ तास चौकशी
3 फास्टॅग सक्ती म्हणजे संचार अधिकार संकोच नव्हे!
Just Now!
X