वसई : वसई विरार शहरात सोमवारी तब्बल ११ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

वसई विरार मध्ये मागील दोन दिवसांपासून प्राणवायू चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या  ११ जणांचा मृत्यू झाला आहे.  यातील ७ रुग्ण  हे नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात २ रुग्ण हे नालासोपारा रीद्धीविनायक रुग्णालयात एकाचा वसईतील कृष्णा रुग्णालयात मृत्यू झाला. तर १ रुग्ण हा वसईच्या ग्रामीण भागात दगावला आहे.  यातील विनायका या खाजगी रुग्णालयातील काही रुग्ण हे प्राणवायू न मिळाल्याने दगावल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमच्या रुग्णालयात ३ रुग्ण दगावले. त्यातील २ करोना मुळे दगावले आहेत, अशी माहिती रिद्धीविनायक रुग्णालयाचे व्यवस्थापक सागर वाघ यांनी दिली.

विनायका रुग्णालयातील डॉक्टरांशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र या रुग्णालयात ७ रुग्ण दगावल्याची माहिती नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली