दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यात मुंबई महापालिकेला यश आले असले तरी पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरिन ड्राइव्ह, चिराबाजार, गिरगाव त्याचबरोबर कुर्ला, गोरेगाव आणि परिसरात अजूनही मोठय़ा प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना तहान भागविण्यासाठी बाटलीबंद पाण्याच्या वापर करावा लागत आहे.
मुंबईकरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे विविध ठिकाणांहून नमुने घेऊन त्यांची जी-उत्तर विभाग कार्यालय आणि भांडुप संकुलातील प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने जाहीर केलेल्या ‘पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल २०१३-१४’ मधील आकडेवारीवरून मुंबईकरांना आजही सरासरी ११ टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१२-१३ मध्ये मुंबईकरांना सरासरी २० टक्के, तर २०११-१२ मध्ये सरासरी १६ टक्के दूषित पाणी मिळत होते. यंदा दूषित पाणीपुरवठय़ाची सरासरी टक्केवारी कमी झाली असली तरी मरिन ड्राइव्ह, चिराबाजार, गोरेगाव, कुर्ला आणि आसपासच्या परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यात पालिका सपशेल अपयशी ठरली आहे.
दूषित पाण्याची टक्केवारी
*गोरेगाव (पश्चिम) २१ टक्के
*कुर्ला (पश्चिम) २२ टक्के
*माटुंगा (पश्चिम) १३ टक्के
*भायखळा १४ टक्के
घाटकोपरमध्ये परिस्थिती गंभीर
घाटकोपर परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली आहे. घाटकोपरमध्ये २०११-१२ मध्ये १४ टक्के दूषित पाणीपुरवठा होत होता आणि आता २०१३-१४ मध्ये तब्बल १८ टक्के दूषित पाणी घाटकोपरवासीयांना मिळत आहे.