राज्यभरात ११ टक्के बसचे परवाने रद्द

मुलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये राज्यभरातल्या शाळा बसची प्रादेशिक परिवहन विभागाने वैध योग्यता तपासणी केली. मुंबई, पुणे या शहरांपेक्षाही विदर्भातील सर्वाधिक शाळा बस या वैध योग्यता तपासणीमध्ये नापास झाल्याचे परिवहन विभागाच्या या तपासणी अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सर्वात जास्त बस अपघात याच विभागात घडले असून २५ टक्के बसवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या खालोखाल मुंबईमध्ये १८ टक्के तर पुण्यामध्ये  ९ टक्के बसचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. कोकणामध्ये मात्र अवघा एक टक्का बस या तपासणीदरम्यान दोषी आढळून आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे हे प्रत्येक शालेय बसला बंधनकारक आहे; परंतु बऱ्याचशा बस ही नियमावली धुडकावून लावत मुलांची वाहतूक करताना आढळून आल्या आहेत. बसधारकांच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये राज्यभरातील बसची वैध योग्यता तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने प्रादेशिक परिवहन विभागाला दिले. या आदेशानुसार परिवहन विभागाकडे नोंदणी असलेल्या बसना ही तपासणी करून घेण्यासाठी संबंधित परिवहन कार्यालामध्ये हजर होण्याचे पत्रक पाठविण्यात आले होते.

हजर झालेल्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी, दोन अग्निशमन यंत्रे, खिडक्यांना जाळी आदी गोष्टींची पूर्तता केली असल्याची पडताळणी या तपासणीदरम्यान केली गेली. राज्यातील जवळपास ११ टक्के स्कूल बस या तपासणीमध्ये दोषी आढळली असून बसेस त्यांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले आहेत. विदर्भातील प्रामुख्याने चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा ग्रामीण भाग या विभागांमध्ये २२२९ बसच्या तपासणीदरम्यान दोषी आढळलेल्या ५७७ बसेसवर कारवाई करण्यात  आली आहे. यापाठोपाठ मुंबईमधील ३२०४ स्कूल बसच्या तपासणी दरम्यान ५८२ बसचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सर्वाधिक शाळा बस या पुण्यामध्ये असून ५८४८ बसेसच्या तपासणीमध्ये ५४१ बसचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

राज्यातील सर्वाधिक दंडात्मक कारवाई ही पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने केली असून २४ लाख २७ हजार ३३१ रुपये रक्कम दंड स्वरूपात वसूल केली आहे. ठाणे जिल्हय़ांमध्ये ३९२६ बसपैकी २७१ बसेसवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर स्कूल बसची

नियमावली धुडकावून लावणाऱ्यांना जरब बसली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मे महिन्याच्या सुट्टय़ांमध्ये शाळा बसची तपासणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्या आदेशानुसार राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागामध्ये आता या बसची तपासणी सुरू आहे.

untitled-5

untitled-6