४८ लाख शेतकऱ्यांना ३३, ११५ कोटींचे कर्जवितरण

राज्यातील ग्रामीण पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची कामे केल्याने सुमारे ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून ४८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३३ हजार ११५ कोटी रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे, तर सहा लाख ८५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.

राज्यस्थापनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे ध्वजवंदन झाले. या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामगिरीचा राज्यपालांनी आपल्या भाषणात आढावा घेतला.

राज्यपाल म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात अडीच लाखाहून अधिक कामे करण्यात आली आहेत. त्यातून १२ लाख हजार घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आह. मागेल त्याला शेततळे योजनेतून शाश्वत शेतीचा मार्ग खुला होत आहे. विदर्भ व मराठवाडय़ातील चार हजार गावांना अवर्षणमुक्त करण्यासाठी ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ साकारण्यात येत आहे.

राज्य सरकारने २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी केली आहे, असे सांगून यंदाच्या वर्षी दोन ऑक्टोबपर्यंत राज्यातील नागरी भाग हागणदारीमुक्त होईल, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

सुमारे ४६ हजार कोटी रुपये खर्च करुन मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग बांधला जाईल, अशी ग्वाही देत मेट्रो प्रकल्प, मुंबईतील विविध पायाभूत प्रकल्प, ३० हजार किमीचे ग्रामीण रस्ते, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा राज्यपालांनी घेतला.

जलयुक्त शिवार योजनेमुळे परिवर्तन

मुंबई : जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत, ज्या ठिकाणी टँकर्सची लक्षणीय संख्या होती, तेथे टँकरचे प्रमाण झपाटय़ाने कमी झाले आहे. जलयुक्त शिवार ही एक आता लोकचळवळ झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील दुष्काळमुक्तीसाठीच्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस याांनी या वेळी दिली.