करोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलं आहे. त्यात महाराष्ट्रात मुंबईला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यात अनेकांनी आपल्या लोकांना गमावलं आहे. ही अशीच एक गोष्ट आहे मुंबईतील एका उपनगरात राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलाची. त्याच्याही कुटुंबाला करोनासारख्या आजारानं विळखा घातला. त्यातच त्यांच्यावर पहिला दु:खाचा डोंगर कोसळला तो म्हणजे १३ एप्रिल रोजी त्या मुलाच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला. कुटुंब या दु:खात असताना त्याच्या आईचाही करोना अहवाल समोर आला. यामध्ये त्याच्या आईलाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याच्या आईला कादिवलीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशा परिस्थितीत १० दिवस तो ११ वर्षीय मुलगा एकटा घरी राहत होता.

१० एप्रिल रोजी त्याच्या वडिलांच्या घशात थोडा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना हळूहळू शिंका आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. दर एका दिवसाआड त्यांना उलट्याही होत होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या वडिलांची आणि आईची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाला ही माहिती समजल्यानंतर त्यांनी त्या मुलाची जबाबदारी स्वीकारली. मुंबई मिररनं यासंदर्भातली वृत्त दिलं आहे.

इमारतीत राहणाऱ्या त्या कुटुंबाकडून त्याला रोज जेवण येत होतं. मुलाच्या घरी ते दाम्पत्य जेवणाचं ताट पोहोचवत असंत. इमारतीतील अनेक कुटुंब अशीही होती ज्यांनी करोनाच्या भीतीनं मदत केली नसल्याचं त्यानं सांगितलं. ज्या कुटुंबानं त्या मुलाची जबाबदारी घेतली त्या रोज दर दोन तासांनी फोन करून काय हवं नको याबाबत विचारणा करत होत्या.

परंतु रात्री जेव्हा घरी एकटा असायचो तेव्हा खुप भीती वाटायची असंही त्यानं बोलताना सांगितलं. परंतु त्यावेळी बंगळुरूमध्ये राहणाऱ्या त्याच्या काही कुटुंबीयांनीही त्याची भीती घालवण्यास मदत केली. या दिवसांमध्ये रोज दोन तास अभ्यास आणि काही कार्टून पाहिल्याचंही त्यानं सांगितलं. ४ मे रोजी त्याच्या आईला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. परंतु आपल्या कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती गेल्यानं आजही ते कुटुंब अतिशय दु:खातच आहे.