विनायक परब vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab

कान्हेरीची ११० लेणी असलेल्या डोंगराच्या मागच्या बाजूस घनदाट जंगलामध्ये २०१३ साली सापडलेल्या इसवीसनपूर्व शतकातील सात लेणींशिवायदेखील पूर्ण नागरीकरण झालेल्या मुंबईच्या दाट वस्तींमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये त्याचप्रमाणे इमारतीमध्ये तळमजल्याखाली किंवा काही ठिकाणी डोंगरावरच्या वस्तीमध्ये लेणी सापडू शकतात, असे चार वर्षांपूर्वी कुणाला सांगितले असते तर कदाचित विश्वासच बसला नसता. मात्र साष्टी गवेषणाच्या दोन वर्षांच्या प्रकल्पामध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी उघडकीस आल्या. शीव येथील गावदेवी मंदिर आतून पाहिले तर पूर्णपणे टाइल्स लावून चकाचक केलेले मंदिर आहे. मात्र बाहेरून ते पाहिले तर लक्षात येते की, ती लेणी होती. लेणीचा वरचा भाग कापून काढून त्यावर काँक्रीटचा थर चढविण्यात आला आणि आतून टाइल्स लावण्यात आल्या होत्या.

मुलुंड पश्चिमेला तर एका दुमजली इमारतीचे नावच बाबाजीनी झोपडी असे आहे. श्री उदासीन आखाडा बडा आश्रम यांचे मंदिर या इमारतीमध्ये खालच्या बाजूस आहे. दुमजली इमारतीचे नाव झोपडी असल्याचे पाहून गुरासाहिबसिंग सेट्टी, वर्षां चॅटर्जी, निशिगंधा उसपकर व विनायक परब या संशोधक चमूला आश्चर्य वाटले. चौकशीनंतर कळले की, तिथे पूर्वी उदासीन बाबा आखाडय़ातील साधूंची झोपडी होती आणि त्यात जमिनीखाली असलेल्या छोटेखानी गुंफेमध्ये ते ध्यानधारणा करीत असत. अशाच प्रकारची केवळ एकाच व्यक्तीला बसून ध्यानधारणा करता येऊ शकेल या आकाराची लेणी कांजूरमार्ग डोंगरावर विहार तलावाच्या बाजूसही सापडली. तिथेही नवनाथ पंथाच्या साधूची कुटी आहे. तिथे असलेली लेणीही जमिनीखाली असून आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. हा डोंगर पवई आयआयटी आणि कांजूरमार्गच्या बरोबर मधोमध आहे. याच डोंगराच्या पायथ्याशी काम सुरू असताना नाण्यांनी भरलेले मातीचे भांडे सापडल्याची नोंदही आहे. या कांजूरमार्गच्या पुढच्या बाजूस घाटकोपरच्या दिशेने गेल्यानंतर तिथेही डोंगरावर नवनाथांचे स्थान सापडते. एकूणच या परिसरामध्ये मुलुंडपासून घाटकोपर- कुर्ला- चुनाभट्टी आणि अगदी शीव ते अँटॉप हिलपर्यंत मध्ययुगात इथे नांदलेल्या नवनाथ संप्रदायाच्या अनेक खाणाखुणा सापडतात.

चुनाभट्टीच्या चाफेगल्लीमध्येही संशोधक चमूला एका जिमखान्याच्या खालच्या बाजूस तळघर सापडल्याची माहिती मिळाली. तिथेही खालच्या दिशेने जाणाऱ्या दगडी पायऱ्या पाहून तीही लेणीच असल्याची खात्री पटली. तिथे तर लेणीच्या बरोबर मध्यभागी एका देवतेचे अंकन केले आहे. त्यावर शेंदूरलेपन एवढे केले आहे की, देवता कोणती ते लक्षात येत नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ते महाकाली किंवा महिषासुरमर्दिनीचे अंकन असावे, असा कयास आहे. चुनाभट्टीला जोडून पुढे असलेल्या शीव पट्टय़ामध्ये अँटॉप हिल परिसरात दोन महत्त्वाच्या गोष्टी या चमूच्या लक्षात आल्या. त्यातील पहिली म्हणजे मुंबई परिसरातील तृतीयपंथीयांच्या देवतेचे एकमात्र मंदिर अँटॉप हिलला असून हे मंदिरदेखील लेणीमध्येच वसलेले आहे. याच परिसरामध्ये गांधीया मंदिर परिसरात बाहेरच्या बाजूस असलेली शिल्पाकृती ही आज हनुमान म्हणून पुजली जात असली तरी ती नाथपंथातील कानफाटय़ा जोगीची प्रसिद्ध शिल्पाकृती आहे.

याचबरोबर अंधेरी परिसरात काम करणाऱ्या समर्थ परब, मृगा बनये आणि एडलिन फर्नाडिस या संशोधक चमूला गुंदवली गावठाणामध्ये श्री शिवसाई मंदिर लक्षात आले. त्याच वेळेस हेही समजले की, हे मंदिर म्हणजे मध्ययुगीन लेणीच आहे. हा परिसर गोरख गुंफा परिसर म्हणून ओळखला जातो. ही नाथपंथीयांमधील गोरखनाथांना मानणाऱ्या नाथपंथीयांची गुंफा असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. एकुणात काय, तर इसवी सनाच्या १० व्या शतकाच्या आसपास मुंबई परिसरामध्ये नाथपंथीयांचे बऱ्यापैकी प्राबल्य होते आणि त्यांच्या अस्तित्वाच्या असलेल्या विविध खुणा गुंफा- लेणींच्या रूपाने आजही मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळतात, असे या दोन वर्षांत पार पडलेल्या गवेषणामध्ये लक्षात आले.