मुंबईत शनिवारी करोनाचे १,१८८ नवीन रुग्ण आढळले तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या सलग तीन दिवस हजाराच्या पुढे जात असून रुग्ण दुपटीचा कालावधी २३७ दिवसांपर्यंत खाली गेला आहे. मात्र एकाच दिवसात १,२५३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शनिवारी  १,१८८  नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३,३२,२०४ झाली आहे. तर एका दिवसात १,२५३ रुग्ण बरे झाले असल्याने आतापर्यंत ३,०९,४३१ म्हणजेच ९३ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून  सध्या १०,३९८ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सुमारे साडेसहा हजारापेक्षा अधिक  रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत तर सुमारे साडेतीन हजार रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शुक्रवारी  २०,५०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७५०० प्रतिजन चाचण्या होत्या.  एकू ण चाचण्यांपैकी सहा टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३३ लाख ९३ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन पुरुष व तीन महिला होत्या.  एका रुग्णाचे वय ४० वर्षांखाली होते.  मृतांची एकूण संख्या ११,४९५ वर गेली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर आणखी वाढून ०.२९ टक्के  झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही २३७ दिवसांपर्यंत खाली गेला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.

१०० वर्षांच्या आजीबाईंचे लसीकरण

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत बीके सी करोना उपचारात शनिवारी १०० वर्षांच्या आजीबाईंनी लस घेतली. प्रभावती खेडकर असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म ५ मार्च १९२१ चा आहे. लस घेऊन त्यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा के ला. तर याच के ंद्रात शनिवारी अभिनेता जॉनी लिवर यांनीही लस घेतली.