लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महालक्ष्मी येथे रेल्वेवरील पूल बांधण्यासाठी १९९ झाडे हटवावी लागणार आहेत, तर हँकॉक पुलाच्या उर्वरित कामासाठी आणखी ३२ झाडे हटवावी लागणार आहेत. या दोन्ही ठिकाणची झाडे हटवण्यासाठीचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीसमोर चर्चेस येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महालक्ष्मी स्थानकावरील पुलांच्या बांधकामासाठी टाळेबंदीपूर्वी कंत्राट देण्यात आले होते. या पुलांच्या बांधकामाला आता सुरुवात झाली आहे. डॉ. ई. मोझेस मार्गावरून आणि केशवराव खाडये मार्गावरून असे दोन पूल येथे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलावरील भार कमी होण्यास मदत होईल. या दोन पुलांसाठी ७८५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र या पुलांच्या बांधकामाच्या जागी २६५ झाडे असून त्यापैकी १९९ झाडे हटवावी लागणार आहेत. त्यापैकी १५३ झाडे कापावी लागणार असून ४६ झाडे पुनरेपित करावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरणाला पाठवला आहे. झाडे काढल्यानंतर १५ दिवसांत पूल विभागाच्या वतीने महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात ४५० झाडे लावली जाणार आहे.