मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेतील पहिली यादी बुधवारी जाहीर झाली. यामध्ये एक लाख ७६ हजार ८७६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. या विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक होते. यातील केवळ एक लाख सहा हजार ५३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे उर्वरित तब्बल ६८ हजार विद्यार्थी आता या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे त्या महाविद्यालयांमध्ये जाऊन ५० रुपये भरून प्रवेश निश्चित करावयाचा असतो. या प्रवेशनिश्चितीनंतरच त्या विद्यार्थ्यांचे नाव दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाते. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक होते. शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या गुणवत्ता यादीतील एक लाख सहा हजार ५३७ विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे. या आकडेवारीत आणखी एक ते दोन हजार विद्यार्थीसंख्या वाढू शकते, असेही शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
यानुसार प्रवेशनिश्चिती करणाऱ्यांची संख्या ही एक लाख आठ हजारांपर्यंत वाढू शकणार आहे. म्हणजे उर्वरित ६८ हजार जागा या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय पहिल्या गुणवत्ता यादीत शिल्लक राहिलेल्या १३ हजार ९३३ जागांचाही यात समावेश होणार आहे. म्हणजे पुढील गुणवत्ता यादींसाठी अंदाजे ७२ हजार जागा उपलब्ध होणार आहेत.
यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीत समावेश न झालेल्या तब्बल २६ हजार ५०२ विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेमध्ये एक लाख ९० हजार ८०९ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल दोन लाख तीन हजार ३७८ अर्ज आले होते. यामुळे १२ हजार ५६९ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या विद्यार्थ्यांची चिंता आता मिटली आहे. यामुळे यंदा एकही विद्यार्थी प्रवेशाशिवाय राहणार नसल्याचा अंदाज शिक्षण विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.