वैयक्तिक माहितीचा पहिला भाग भरण्याचे आवाहन
अकरावीला २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या संकेतस्थळावर पहिल्याच दिवसापासून चांगलाच ताण आहे.
ऑनलाइन प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयाच्या http://www.dydemumbai.org आणि http://fyjc.org.in/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी, पासवर्ड, कॉलेज कोडसह नमुना प्रवेश अर्ज असणारी माहितीपुस्तिका १५० रुपये शुल्कात मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) आपापल्या माध्यमिक शाळेतून वा एमएमआर क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवरून मिळविता येतील.
विद्यार्थाना प्रवेश अर्ज दोन भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळेच्या मदतीने ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक माहितीचा भाग आताच भरता येईल. दुसरा पसंतीक्रमाशी संबंधित महत्त्वाचा भाग महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर भरता येईल. त्यासाठीचे वेळापत्रक निकालानंतर जाहीर करण्यात येईल.

सीबीएसईची चार केंद्रे
सीबीएसई या केंद्रीय मंडळाच्या ज्या विद्यार्थ्यांना गुणाऐवजी श्रेणी दिली जाते, अशा विद्यार्थ्यांना श्रेणीचे गुणांमध्ये रूपांतर करून घेण्याकरिता चार ठिकाणी केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सांताक्रूझची आर. एन. पोद्दार स्कूल, नेरूळची एपीजे आणि डीएव्ही पब्लिक स्कूल, ऐरोलीची डीएव्ही पब्लिक स्कूल या ठिकाणी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपल्या श्रेणीचे गुणांमध्ये रूपांतर करून घेता येईल.