शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला समितीचा विरोध; पटसंख्या न वाढवणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश

पटसंख्या घसरल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या मराठी, उर्दू आणि गुजराती माध्यमाच्या तब्बल १२ प्राथमिक शाळांचे अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा घाट घातला आहे. मात्र शिक्षण समितीने सोमवारी या शाळांच्या विलीनीकरणास कडाडून विरोध करीत शिक्षण विभागाने सादर केलेले प्रस्ताव रोखून धरले. घसरलेली पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न न करणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी दिले.

पटसंख्या घसरल्यामुळे प्रशासनाने खंबाला हिल प्राथमिक मराठी शाळा, भवानी शंकर रोड मराठी शाळा, सायन कोळीवाडा मनपा गुजराती शाळा, सहकार नगर मनपा मराठी शाळा, कस्तुरबा गांधीनगर मनपा मराठी शाळा, किंग्ज सर्कल मनपा उर्दू शाळा, गणपतराव कदम मार्ग मनपा तेलुगु शाळा, चंडिका संस्थान मराठी शाळा, धारावी टी. सी. तेलुगु शाळा, गणपतराव कदम मार्ग मनपा मराठी शाळा, धोबीघाट मनपा मराठी शाळा या ११ शाळांतील विद्यार्थ्यांची पटसख्या कमालीची घसरली आहे. त्यामुळे या शाळा पालिकेच्या अन्य शाळांमध्ये विलीन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. याबाबतचे प्रस्ताव शिक्षण समितीच्या सोमवारच्या बैठकीत सादर करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी शाळा बंद करून त्या अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यामुळे शिक्षण समिती सदस्य प्रचंड संतापले होते. गरीब कुटुंबांतील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून पालिकेने शाळा सुरू केल्या. मात्र सारासार विचार न करता शिक्षण विभागाने शाळा बंद करून त्यांचे विलीनीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. शिक्षण विभागाच्या या भूमिकाबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी म्हणून त्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. असे असतानाही या १२ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरलीच कशी, असा सवाल करीत शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी या १२ शाळांचा आढावा घेण्याचे आदेश दिले.

या १२ शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले की नाहीत याचा अहवाल सादर करावा. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, असेही आदेश शुभदा गुडेकर यांनी दिले.

स्थानिक आमदार, नगरसेवक, शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नावर लवकर तोडगा काढावा. कोणत्याही परिस्थितीत या शाळा बंद करू नयेत, असे गुडेकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्याध्यापक, शिक्षक-पालक संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पालिका उपायुक्त मिलिंद सावंत यांनी दिले.