हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी पुढील आठवडय़ात ७२ तासांचा जंबो ब्लॉक होणार असला, तरी प्रत्यक्षात या गाडय़ा धावण्यासाठी मे महिना उजाडणार आहे. आधीच्या नियोजनानुसार या मार्गावर डीसी-एसी परिवर्तन आणि १२ डब्यांच्या गाडय़ा हे दोन्ही प्रकल्प एकाच वेळी अमलात येणार होते. मात्र गाडय़ांच्या कमतरतेमुळे आता डीसी-एसी परिवर्तनाला प्राधान्य देण्यात आले असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने हार्बर मार्गावर धावणाऱ्या सर्वच्या सर्व ३६ गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. १५ जूनपर्यंत या मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या होतील.
१२ ते १४ फेब्रुवारी या तीन दिवसांत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे ७२ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठीची कामे करण्यासाठी होणार आहे. मात्र हा ब्लॉक यशस्वी झाल्यानंतरही हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ांआधी डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
डीसी-एसी परिवर्तन आणि १२ डब्यांच्या गाडय़ा हे दोन्ही प्रकल्प एकत्र अमलात आणणे शक्य नाही. १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी जादा डब्यांची गरज आहे. ही गरज जून महिन्याशिवाय पूर्ण होणार नाही. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर डीसी-एसी परिवर्तन करणे शक्य नाही. त्यामुळे आधी डीसी-एसी परिवर्तन करून मग टप्प्याटप्प्याने १२ डब्यांच्या गाडय़ा या मार्गावर चालवण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

या निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत हार्बर मार्गावरील ताफ्यातील नऊ डब्यांच्या सर्वच्या सर्व ३६ गाडय़ा डीसी विद्युतप्रवाहावरून एसी विद्युतप्रवाहावर परिवर्तित करण्यात येतील. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत २० गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात येतील. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हार्बर मार्गावरील तब्बल २०० सेवा १२ डब्यांच्या चालवण्यात येतील. त्यानंतर ३१ मेपर्यंत आणखी १० गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात येतील. तर उर्वरित सहा गाडय़ा पुढील १५ दिवसांत म्हणजेच १५ जूनपर्यंत १२ डब्यांच्या केल्या जातील, असेही पाटील यांनी सांगितले. त्यानंतर जूनच्या मध्यापासून हार्बर मार्गावरील सर्वच्या सर्व ५९० सेवा १२ डब्यांच्या चालवल्या जाणार आहेत.