डीसी-एसी परिवर्तनापाठोपाठ हार्बर मार्गावर आता मध्य रेल्वे १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी मंगळवारी रात्री घेतलेल्या चाचणीत मध्य रेल्वे थोडक्यात नापास झाली. या चाचणीदरम्यान वडाळा आणि डॉकयार्ड रोड येथे प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याचे निरीक्षण रेल्वे अधिकाऱ्यांनी नोंदवले. वडाळा येथील प्लॅटफॉर्मची लांबी रेल्वेसाठी, तर डॉकयार्ड रोड येथील प्लॅटफॉर्मची लांबी प्रवाशांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरील या प्रकल्पाबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी पत्रकार परिषद घेत १५ दिवसांत पहिली गाडी चालवण्याची माहिती १२ एप्रिल रोजी दिली होती. त्यासाठी १९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच या मार्गावर १२ डब्यांची गाडी चालवण्याबाबत चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान वडाळा आणि डॉकयार्ड रोड येथे अद्यापही कामे योग्य पद्धतीने पूर्ण झाली नसल्याचे आढळले आहे.
वडाळा येथे मोटरमन केबिन आणि सिग्नल अगदी बाजूबाजूला येत असल्याने मोटरमनला सिग्नल बघताना अडथळा येत आहे. रेल्वेच्या परिचालनात ही बाब योग्य नसल्याने आता गाडी थोडी मागे थांबवावी लागणार आहे.