News Flash

हार्बरवर १२ डब्यांच्या गाडय़ांचा प्रकल्प लांबणीवर

मध्य रेल्वेचा हार्बरकरांना पुन्हा एकदा ठेंगा; अनेक कामे प्रलंबित असल्याने विलंब

मध्य रेल्वेचा हार्बरकरांना पुन्हा एकदा ठेंगा; अनेक कामे प्रलंबित असल्याने विलंब

‘हार्बर मार्गावर १२ डब्यांची पहिली गाडी पुढील १५ दिवसांच्या आत चालवू’, ही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची घोषणा अखेर वल्गनाच ठरली असून पुढील चार महिने १२ डब्यांची गाडी हार्बर मार्गावर चालण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीच ही गोष्ट स्पष्ट केल्याने रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. एकच गाडी १२ डब्यांची करून तिच्या १० ते १२ सेवा चालवण्यापेक्षा आठ ते नऊ गाडय़ा १२ डब्यांच्या करून किमान १०० सेवा चालवणे योग्य असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र १२ डब्यांच्या गाडय़ा चालण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा अद्याप उभ्या राहिलेल्या नाहीत.

हार्बर मार्गावर पावसाळ्याआधी १२ डब्यांची गाडी चालवण्याबाबत मध्य रेल्वे प्रयत्नशील होती. त्यानुसार १२ एप्रिल रोजी मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी पत्रकार परिषद घेत पुढील १५ दिवसांत हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी चालवण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार या मार्गावर १२ डब्यांच्या गाडीची चाचणीही घेण्यात आली. काही ठिकाणी कामे पूर्ण न झाल्याने ही चाचणी अपयशी ठरली. त्यानंतर ओझा यांना शनिवारी याबाबत विचारले असता डब्यांच्या कमतरतेमुळे १२ डब्यांची गाडी तूर्तास हार्बरवर चालवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

१२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी ९ डब्यांच्या सर्वच गाडय़ांना तीन तीन डबे जोडावे लागतील. त्यासाठी १२०हून अधिक डब्यांची आवश्यकता आहे. सध्या १२ डब्यांची एकच गाडी हार्बरवर चालवल्यास या गाडीमार्फत फक्त १२ सेवा चालवणे शक्य होईल. त्याचा फार फायदा होणार नाही. त्यामुळे किमान आठ ते नऊ गाडय़ा १२ डब्यांच्या झाल्यावर एकदम १०० सेवा १२ डब्यांच्या केल्या जातील, असे ओझा यांनी सांगितले.

मात्र डब्यांच्या कमतरतेपेक्षाही १२ डब्यांची चाचणी घेतल्यानंतर आढळलेल्या त्रुटींमुळे हा प्रकल्प पुढे ढकलण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांचे म्हणणे आहे. डॉकयार्ड रोड येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांब फक्त २६२ मीटर एवढीच आहे. ही लांबी १२ डब्यांच्या गाडीच्या लांबीएवढीच असल्याने मोटरमनचे काम अगदीच जिकिरीचे होणार आहे. प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन ती लांबी वाढवणे गरजेचे आहे. त्याशिवाय वडाळा येथेही मोटरमन केबिन आणि सिग्नल अगदीच जवळ असल्याने मोटरमनला सिग्नल दिसणे शक्य नाही. येथेही प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागेल. या कामांसाठी चार महिन्यांपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच १२ डब्यांची गाडी हार्बरवर चालण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 2:42 am

Web Title: 12 coach trains on harbour line
Next Stories
1 मुंबईत चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत निरुत्साह
2 बेकायदा सावकारीला सरकारचे संरक्षण
3 हृदयनाथ मंगेशकर, शांता गोखले, प्रदीप मुळ्ये, शफाअत खान मानकरी
Just Now!
X