‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे जंबो ब्लॉक गुंडाळला; पंतप्रधानांच्या मुंबईतील उपस्थितीचा दबाव
हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे महत्त्वाची कामे करण्याच्या दृष्टीने आखलेला ७२ तासांचा जंबो ब्लॉक रेल्वेने गुंडाळला आहे. १२, १३ आणि १४ फेब्रुवारी यांदरम्यान होणार असलेल्या या ब्लॉकदरम्यानच मुंबईत ‘मेक इन इंडिया’चा भव्य कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात उपस्थित असताना ७२ तास हार्बर मार्गाची वाहतूक बंद ठेवायची का, असा प्रश्न रेल्वेला पडल्याने हा ब्लॉक रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते अशा कोणत्याही ब्लॉकचे नियोजन रेल्वेने केलेच नव्हते.
हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालण्यासाठी सीएसटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांबी वाढवणे, येथील स्टेबलिंग लाइन काढणे, परस्पर छेदणाऱ्या रूळांची जागा बदलणे आदी कामे करणे आवश्यक आहे. ही कामे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण करत असून त्यासाठी रेल्वेतर्फे १२, १३ आणि १४ फेब्रुवारी या तीन दिवशी मिळून ७२ तासांचा जंबो ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. या ब्लॉकची तयारी करण्यासाठी रेल्वेने ३ फेब्रुवारीपासून पुढील नऊ रात्री म्हणजे ११ फेब्रुवारीपर्यंत दर रात्री तीन तासांचे विशेष ब्लॉकही घेतले आहेत.
मात्र, ‘मेक इन इंडिया’चा भव्य कार्यक्रम १३ फेब्रुवारीपासून मुंबईत होत असून आठवडाभराच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत येणार आहेत. त्याचप्रमाणे विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योजक आदी महत्त्वाच्या व्यक्ती मुंबईत असतील. त्यामुळे पंतप्रधान शहरात असताना ७२ तासांचा ब्लॉक घ्यावा का, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॉक रेल्वे आठवडाभरासाठी पुढे ढकलत आहे. त्याबाबत बुधवारी निर्णय होण्याची शक्यताही या अधिकाऱ्याने वर्तवली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांच्या मते अशा कोणत्याही जंबो ब्लॉकचे नियोजन मध्य रेल्वेने केले नव्हते. रेल्वेने कोणत्याही तारखांवर शिक्कामोर्तब केले नसून योग्य तारखा निवडून ब्लॉक घेतला जाईल, असे ओझा म्हणाले. पण ३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉकची माहिती देताना मध्य रेल्वेच्या जनसंपर्क खात्यातर्फे हा ब्लॉक ७२ तासांच्या जंबो ब्लॉकच्या तयारीसाठी आखल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रेल्वेमध्येच संभ्रमाचे वातावरण होते. तूर्तास तरी हार्बर मार्गावरील ‘मेक इट १२ डबा’ हा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे.