कांदिवली येथील गणेश नगरमध्ये गुरूवारी संध्याकाळी एलपीजी गॅस सिलेंडरमधून झालेल्या गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटात १२ जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जण गंभीर असून त्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे.
गणेश नगर येथील इस्माईल कंपाऊड येथे भंगार गल्ली आहे. या ठिकाणी एक भंगार विक्रेता या गॅस सिलेंडर मधील गॅस बाहेर काढत असताना अचानक स्फोट होऊन आग लागली. सर्व जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या परिसरात रिलायन्स एनर्जीचा केबल बॉक्स आहे. गॅस सिलेंडर मधून निघालेल्या आगीचा त्याच्याशी किंवा कोणत्यातरी ज्वालाग्राही पदार्थाशी संपर्क आल्याने ही आग पसरली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.