दुचाकीस्वाराच्या मृत्युप्रकरणी बेस्ट ७० टक्के दोषी

मुंबई : रस्त्याच्या मध्यभागी तेही रात्रीच्या वेळी गाडी चालवणे मान्यच के ले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत २०१५ मध्ये मालवणी येथे झालेल्या अपघातासाठी मोटार अपघात दावा लवादाने बेस्ट बसचा चालक आणि दुचाकीस्वार अशा दोघांनाही जबाबदार धरले. त्यातही लवादाने या अपघातासाठी बेस्टच्या चालकाला ७० टक्के  जबाबदार धरले आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना १२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

मालाड येथील रहिवासी असलेला हा २२ वर्षांचा दुचाकीस्वार रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करत होता. तसेच त्याला महिना साडेआठ हजार रुपये वेतन होते. याप्रकरणी लवादाने त्याच्या कुटुंबीयांना १५.६० लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. मात्र या अपघातासाठी मृत दुचाकीस्वाराचा निष्काळपणाही कारणीभूत होता. त्यामुळे लवादाने नुकसान भरपाईच्या रकमेतून ३.६० लाख रुपये कमी केले. रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. आणि अपघाताच्या ठिकाणीही वळण होते. त्यामुळे अशा ठिकाणी गाडी चालवताना ती नियंत्रणात ठेवून आणि कमी वेगाने चालवणे हे बेस्ट बसचालक आणि दुचाकीस्वाराचे कर्तव्य होते, परंतु त्यांनी बेदरकार आणि निष्काळणीपणे गाडी चालवली. त्यातही बेस्ट बस ही अवजड वाहनांच्या श्रेणीत येत असल्याने बसचा चालक निष्काळजीसाठी अधिक जबाबदार असल्याचे लवादाने म्हटले.

दुचाकीस्वाराची आई सुमन अटवाल यांनी जानेवारी २०१६ मध्ये लवादाकडे भरपाईसाठी दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, २७ डिसेंबर २०१५ रोजी रात्री नऊच्या सुमारास राजू मढ परिसरात दुचाकीवरून फिरत होता. तो ‘आयएनएस हमला’ येथे पोहोचला असता अचानक भरधाव आलेल्या बेस्टच्या बसने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. यात राजूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. राजूच्या आईने केलेल्या आरोपांचे बेस्टने खंडन केले. तसेच अपघाताच्या वेळी राजू मद्याच्या अमलाखाली होता, असा दावाही केला. परंतु राजू मद्याच्या अमलाखाली होता ही बाब सिद्ध होऊ शकलेली नाही.