News Flash

दीड महिन्यात १२ हजार चालकांकडून नियमभंग

नवीन वेगमर्यादा व ‘इंटरसेप्टर’ वाहनांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारवाईत वाढ

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन वेगमर्यादा आणि बेदरकार वाहनांवर कारवाईसाठी तैनात केलेली ‘इंटरसेप्टर’ वाहने यांमुळे गेल्या दीड महिन्यात १२ हजार ३६३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांत ९० टक्के वाहनांचा वेग प्रतितास १०० किमीपेक्षाही अधिक राहिला आहे. तर अन्य प्रकरणांत घाटक्षेत्रात प्रतितास ५० किमीची वेगमर्यादा वाहनचालकांनी ओलांडली आहे.

भरधाव वाहन चालवून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्यातील वाहनांच्या वेगावर नव्याने मर्यादा आणण्यात आली आहे. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी १८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्यातील द्रुतगती मार्गासह, चार मार्गिका रस्ते, महापालिका हद्दीतील रस्त्यावर करण्यात आली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर आठपेक्षा कमी प्रवासी आसन वाहनांसाठी असलेली वेगमर्यादा प्रतितास १०० पर्यंत नेण्यात आली. त्याआधी ती प्रतितास ८० किलोमीटर एवढी होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाटक्षेत्रातील वेगमर्यादा प्रतितास ५० किलोमीटपर्यंत आहे. या वेगमर्यादेबरोबरच बेदरकार वाहनांवर कारवाईसाठी द्रुतगतीवर पळस्पे, बोरघाट, खंडाळा, उरसे या ठिकाणी प्रत्येकी एक ‘इंटरसेप्टर’ वाहन तैनात आहे. ‘लेझर’ तंत्रज्ञानावर आधारित ‘स्पीडगन’, ई-चलान यंत्रणा, मद्यपींवर कारवाईसाठी ‘ब्रेथ अ‍ॅनलायझर’ही आहेत.

१ कोटी २३ लाख दंड वसूल

नवीन वेगमर्यादा आणि इंटरसेप्टर वाहनांमुळे बेदरकार वाहनांवरील कारवाईत १९ नोव्हेंबर २०१९ ते ५ जानेवारी २०२० पर्यंत वाढ झाली आहे. या कालावधीत १२ हजार ३६३ प्रकरणांत चालकांचा बेदरकारपणा आढळला असून त्यांच्यावर केलेल्या कारवाईत १ कोटी २३ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तर जानेवारी २०१९ ते १८ जानेवारीपर्यंत द्रुतगती मार्गावरील कारवाई पाहता ६ हजार २७९ वाहनांवर कारवाई करताना ४५ लाख रुपये दंड वसूल केल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कारवाईत दुप्पटीने वाढ झाली आहे. दीड महिन्यात झालेल्या कारवाईत ९० टक्के वाहनांचा वेग प्रतितास १०० पेक्षा जास्त आढळला. घाटक्षेत्रात वाहनांसाठी प्रतितास ५० किलोमीटरची वेगमर्यादा असून ऊर्वरित प्रकरणे घाटक्षेत्रातील असल्याचे सांगितले.

नवीन वेगमर्यादा आणि इंटरसेप्टर वाहनावरील लेझरयुक्त स्पीडगनमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेदरकार वाहनांवरील कारवाई वाढली आहे. सध्या चार इंटरसेप्टर वाहने असून त्यामुळे कारवाई करणे सोपे जात आहे.

– दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक (ठाणे परिक्षेत्र-वाहतूक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 12:42 am

Web Title: 12 thousand drivers break in a month and a half abn 97
Next Stories
1 परळ येथील वाडिया रुग्णालय बंद करण्याची प्रक्रिया सुरू
2 मराठवाडय़ाला अतिरिक्त पाणी देण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार
3 ‘..तरच मनसेशी युतीबाबत विचार’
Just Now!
X