मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १२०० कॅमेऱ्यांचे लोकार्पण
दहशतवादी कारवायांपासून मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि रस्त्यांवरील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी परिणामकारक ठरणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा निर्माण करण्यात अखेर राज्य सरकारला यश आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील नेव्हीनगर- नरिमन पॉइंट-गिरगाव- वडाळा- वरळीदरम्यान १२०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे ९५० कोटी रुपये खर्चून संपूर्ण शहरात सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली होती.
मात्र या प्रकल्पाची आखणी आणि निविदा प्रक्रिया यामध्ये तब्बल सात वर्षांचा कालावधी निघून गेला. मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असूनही प्रदीर्घ काळ रखडलेली ही योजना अखेर मार्गी लागली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करणाऱ्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले आहे.
पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, गावदेवी, वडाळा, माझगाव, मुंबई पोर्ट, वरळी या भागांत १२०० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून एक हजार कॅमेरे बसवून त्याच्या तांत्रिक चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत.
या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबईवर अहोरात्र पोलिसांची नजर राहणार असून त्यासाठी पोलीस आयुक्तालयात एक विशेष नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला आहे. तेथे सर्व कॅमेऱ्यांमधील मिळणारी माहिती संकलित करण्याबरोबर संशयास्पद हालचालींचे विश्लेषण केले जाणार आहे. अशाच प्रकारे हे कॅमेरे वरळी येथील वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षालाही जोडण्यात आले असून तेथून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात वाहतूक कोंडी झाल्यास त्याची माहिती त्वरित मिळणार आहे.
पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सोमवारी सकाळी ११ वाजता ताज हॉटेल येथे होणार असून दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात म्हणजेच मुलुंड, दहिसर, बोरिवली, चेंबूर, चुनाभट्टी या भागांत ४७३ ठिकाणी १७४० सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत.
तर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित शहरांमध्ये ५८५ ठिकाणी २७०० कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून हे कामही निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.