संदीप आचार्य
मुंबई : मुंबईत यापुढे विभागा-विभागात करोना चाचणी केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून पहिल्या टप्प्यात दररोज १२ हजार करोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अलीकडेच झालेल्या वरिष्ठ अधिकारी व मुंबई कृती दलाच्या डॉक्टरांच्या बैठकीत मुंबईतील करोना चाचण्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी मुंबईत खासगी व शासकीय प्रयोगशाळा मिळून रोजच्या साडेचार हजार चाचण्या होत होत्या. या चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात यापुढे करोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज लागणार नाही तसेच लक्षणं नसलेली व्यक्तीही करोना चाचणी करू शकते असा निर्णय आयुक्त चहल यांनी जाहीर केला. यातून दररोज सात हजारपर्यंत चाचण्या होऊ लागल्या. मात्र पुणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तज्ज्ञांशी चर्चा करून पुण्यातील चाचण्यांची संख्या वाढवून ती दररोज दहा हजारापर्यंत करण्यात आली. मुंबईतही रोज किमान तीस हजारापर्यंत चाचण्या होण्याची गरज असल्याचे टास्क फोर्समधील डॉक्टरांचे म्हणणे असून यातूनच वेगाने करोना रुग्ण व संपर्कातील लोकांचा शोध घेऊन करोनाला अटकाव करता येईल तसेच मुंबईतील करोना मृत्यूदर कमी करता येईल असा विश्वास या डॉक्टरांना वाटतो.

पालिका आयुक्त चहल यांनीही मुंबईतील करोना मृत्यू कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले तसेच करोना चाचण्या जास्तीतजास्त केल्या जातील असे आयुक्तांनी स्पष्ट केले. राज्यात गुरुवारपर्यंत १७,९०,६१० चाचण्या झाल्या असून मुंबईत चाडेचार लाख चाचण्यांची नोंद आहे. मुंबईत आता १०५९२३ रुग्णांची संख्या असली तरी गेल्या काही दिवसात चाचण्यांची संख्या वाढली असली तरी रुग्णसंख्या मात्र कमी झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत रोजच्या रुग्णांची संख्या तेराशे ते पंधराशेच्या दरम्यान असायची मात्र गेल्या काही दिवसात रोज बाराशे च्या आगेमागे करोना रुग्ण आढळून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर करोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून रोज १२ हजार चाचण्या केल्या जातील असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता ते म्हणाले, ही मोहीम आम्ही आजपासूनच सुरु केली आहे. डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच सफाई कामगारांची जागोजागी जाऊन अॅण्टीबॉडी चाचण्या केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन आणि ज्या भागात करोना वाढेल अशा ठिकाणी यापुढे रोज चाचण्या केल्या जातील असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत करोनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रत्येक वॉर्डातही यापुढे करोना चाचणी करण्यासाठी ‘किऑक्स’ उभारले जातील. मात्र या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जाणार असून हे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. गुरुवारपर्यंत चार लाख ५६ हजार चाचण्या झाल्या असून यापुढे दररोज १२ हजार चाचण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.