साहित्यसंपदा समूहाच्या नावे विश्वविक्रम

मुंबई : साहित्यसंपदा समूहातर्फे  २१ चारोळीसंग्रहांच्या प्रकाशन सोहळ्याच्या राष्ट्रीय विक्रमापाठोपाठ १२१ तासांचे विश्वविक्रमी कवीसंमेलन नुकतेच ऑनलाइन व्यासपीठावर पार पडले. १७ जुलैला दुपारी १ ते २२ जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रासह अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, लंडन, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, भोपाळ व बंगळूरु येथील ९००हून अधिक कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. विश्वविक्रमी कवीसंमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार ए. के. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक अरुण म्हात्रे व साहित्यिक, पत्रकार रमेश धनावडेही सहभागी झाले होते.

शेख यांनी ‘कविता ही जगण्याला बळ देणारी, अमृतमयी गोष्ट असते. कवींना साकारणारी, मनाला साद घालणारी, जगायला बळ  देणारी असते, तेव्हा कवितेचा आदर करा’, असा सल्ला दिला. ‘करोना विषाणूने थैमान घातला असतानाही टाळेबंदीत साहित्यसंपदाच्या माध्यमातून माणसांना जपण्याचे, दिलासा देण्याचे काम साहित्यातून लीलया पार पाडले जात आहे. मराठी साहित्याची उंची वाढविण्याचे कार्य साहित्यसंपदा करत आहे’, असे या उपक्रमाचे कौतुक अरुण म्हात्रे यांनी केले.

लहान-थोर सर्वच वयोगटांतील व्यक्तींनी कवीसंमेलनात सहभाग घेतला. ९२ वर्षांच्या लक्ष्मीबाई जुगलदार यांनीही आपली कविता सादर के ली. अभंग, ओवी, लावणी, भावगीत, भक्तिगीत, मुक्तछंदाबरोबरच बहारदार गझल, प्रेमकविता, सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता अशा विविधांगी कविता संमेलनात सादर झाल्या.

८५ तास सलग कार्यक्रम के ल्याचा राष्ट्रीय विक्रम साहित्यसंपदाच्या नावे याआधीच नोंदला गेला आहे. कवीसंमेलनाच्या निमित्ताने हा विक्रम मोडीत निघाला. समारोपाच्या कार्यक्रमात कवी अशोक नायगावकर यांनी मार्गदर्शन के ले. साहित्यसंपदा समूहाचे संस्थापक वैभव धनावडे, अध्यक्षा नमिता जोशी असून आर. जे. कै लास यांच्या कल्पनेतून आणि साहित्यिक रमेश धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.