04 April 2020

News Flash

कर्मचाऱ्यांअभावी दररोज १२५ बेस्ट बस आगारातच

४०० कंत्राटी वाहकांसाठीची निविदा आज खुली होणार; चालक नेमण्याची प्रक्रिया लवकरच

४०० कंत्राटी वाहकांसाठीची निविदा आज खुली होणार; चालक नेमण्याची प्रक्रिया लवकरच

मुंबई : वेळेवर न येणाऱ्या बसगाडय़ांमुळे सध्या बेस्ट उपक्रमाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कमी मनुष्यबळ हे प्रमुख कारण असल्याची माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. कमी मनुष्यबळाअभावी दररोज १२५ बसगाडय़ा बस आगार व स्थानकांत उभ्या राहत असून त्यामुळे वाढीव प्रवासी व उत्पन्नाला मुकत असल्याची माहिती दिली. बसगाडय़ांची वाढत जाणारी संख्या आणि कमी मनुष्यबळ पाहता बेस्टने ४०० कंत्राटी वाहक नेमण्यासाठी निविदा काढली असून ती २९ जानेवारीला खुली होणार आहे. यानंतर येत्या काही महिन्यांत कंत्राटी चालकही नेमण्याचा विचार केला जाणार आहे.

बेस्ट उपक्रमाने भाडेकपात केल्यानंतर प्रवासी संख्या थेट ३४ लाखांपर्यंत पोहोचली. मात्र उत्पन्नात फारशी वाढ झाली नाही. बेस्टने ताफ्यात मिनी, मिडी बसगाडय़ाही दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ३ हजार २०० बसगाडय़ा असून याव्यतिरिक्त २८७ भाडेतत्त्वावरील मिनी बसही दाखल केल्या आहेत. आणखी ११३ मिनी बस फेब्रुवारीत प्रवाशांच्या सेवेत येतील. बसगाडय़ांची संख्या ही टप्प्याटप्याने ६ हजार ५००, तर प्रवासी संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

बसगाडय़ांची संख्या वाढत असल्याने बेस्टला जादा मनुष्यबळाची गरज भासत आहे. चालक-वाहकांचे दोन पाळ्यांमध्ये काम, साप्ताहिक सुट्टी, आरोग्यविषयक कारणे इत्यादींमुळे बेस्टला नियमितपणे सेवा देणे कठीण जाते. बेस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारणांमुळे दरदिवशी १२५ बसगाडय़ा स्थानक आणि आगारांत उभ्या राहतात. त्यामुळे प्रवासी वाढू शकत नाहीत. शिवाय उत्पन्नही बुडते.

भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांवर चालक कंपनीचा आणि वाहक एसटीचा असा नियम आहे. फेब्रुवारी महिन्यात आणखी ११३ बसगाडय़ा येतील. त्यामुळे या बसगाडय़ांवरही वाहकांची गरज लागेल. त्यासाठी सध्याच्या बसताफ्यांवरील वाहक वळवण्याशिवाय पर्याय नसेल. परिणामी पुन्हा बसगाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याने ४०० कंत्राटी वाहक नेमण्याचा निर्णय  घेतल्याचे सांगितले. यासाठीची निविदा बुधवारी खुली होणार आहे. चालकांची संख्याही वाढवण्याचा प्रयत्न असणार असून त्याचाही आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठीही कंत्राटी पद्धतीने चालक नेमणे योग्य आहे का, त्याची पडताळणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2020 2:23 am

Web Title: 125 best buses daily stay in depot due to shortage of employees zws 70
Next Stories
1 मुंबईच्या खरेदी उत्सवाचा दिमाखदार प्रारंभ
2 महिनाभरात फेरीवाल्यांना जागा वितरित करा!
3 विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ, मारहाणप्रकरणी शाळा विश्वस्ताला अटक
Just Now!
X