नदीपात्रात अथवा नाल्यामध्ये रसायने अथवा रासायनिक सांडपाणी सोडू नये, असा कायदा असतानाही ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक कारखान्यांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होत असते. याचाच फटका शनिवारी उल्हासनगर नजीकच्या गावांना बसला. या परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पात्रात घातक रसायने ओतली गेल्याने त्याच्या वासाने परिसरातील असंख्य रहिवाशांना  उलटय़ा, मळमळ, जुलाब, चक्कर येणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे इत्यादी प्रकार सुरू झाले. आपत्कालीन यंत्रणा तातडीने सतर्क झाल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण आले. मात्र तत्पूर्वी १२५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अंबरनाथ-उल्हासनगर परिसरातील तसेच वापीतील काही रासायनिक कंपन्यांमधून उत्पादन झाल्यानंतरची टाकाऊ परंतु अत्यंत घातक अशी रसायने राजरोसपणे वालधुनी नदीच्या पात्रात सोडण्यात येतात. शनिवारी पहाटे अशाच एका टँकरमधून आणलेले घातक रसायन अंबरनाथनजीकच्या वडोल गावाजवळ असलेल्या वालधुनी पात्रात सोडण्यात आले. या रसायनाचा अतिउग्र दर्प क्षणार्धातच परिसरात पसरला आणि परिसरातील नागरिकांना अस्वस्थ वाटू लागले. वडोल गाव, लासी पाडा, सम्राट अशोक नगर आणि नदीशेजारील भागांतील रहिवाशांना उलटय़ा, मळमळ, जुलाब होणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. याबाबतची माहिती मिळताच आपात्कालिन यंत्रणांनी याठिकाणी धाव घेत बाधितांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी दुपापर्यंत रुग्णांची संख्या वाढतच गेली. यापैकी अनेकांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.     
रासायनिक नमुने प्रयोगशाळेत
प्रदूषण नियंत्रण मंडळ, उल्हासनगर पालिका प्रशासन व पोलीस आदी यंत्रणांनी वालधुनी नदीत सोडण्यात आलेल्या घातक रसायनांचे नमुने गोळा करून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. नदीत सोडण्यात आलेले रसायन कोणत्या कंपनीतून आणले होते, याचा शोध सुरू आहे. ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी बी. एस. सोळंके, उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे या भागात तळ ठोकून आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर दोषींविरुद्ध उल्हासनगर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असे पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले.