संदीप आचार्य
मुंबई: बाळंतपणाची वेळ आली तशी वैशाली(नाव बदलून) आणि तिच्या घरच्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली पण तिला करोनाची लागण असल्याने त्या खासगी रुग्णालयाने वैशालीला दाखल करून घेण्यास नकार दिली. त्यामुळे दुसऱ्या मोठ्या खासगी रुग्णालयात धाव घेतली पण तिथेही दाखल करून घेतले नाही. जवळपास सहा रुग्णालयांनी नकार दिल्यावर अखेर रात्री उशीरा त्यांनी पालिकेचे नायर रुग्णालय गाठले.

तिथे डॉक्टरांनी तात्काळ दाखल करून सिझेरियन शस्त्रक्रिया केली. वैशालीने एका सुंदर बाळाला जन्म दिला. महत्वाचे म्हणजे बाळाला करोनाची लागण झालेली नव्हती. “गेल्या महिनाभरात नायर रुग्णालयातील १२६ मातांनी १२९ बाळांना जन्म दिला असून यातील एकाही बाळाला करोनाची लागण झालेली नाही” असे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. निरज महाजन यांनी सांगितले.

एकीकडे करोनाची लागण असलेल्या गर्भवती महिलांवर उपचार करण्याचे तसेच बाळंतपण करण्याची जबाबदारी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात टाळली जात असताना महापालिकेच्या नायर रुग्णालयात मात्र करोनाबाधित महिलांची सुखरूप सुटका करण्याचे व्रत येथील डॉक्टर व अन्य कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत.

करोनाची साथ उद्रेक सुरु झाल्यापासून नायरमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु झाली. नायरमधील जुन्या इमारतीत असलेला स्त्रीरोग चिकित्सा विभाग नवीन इमारतीत हलविण्यात आला. “करोनाच्या गर्भवती माता बाळंतपणासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येतील हे लक्षात घेऊन या विभागात विशेष सज्जता ठेवण्यात आली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांपासून संबंधितांना पुरेसे पीपीई किट पासून आवश्यक ती सर्व तरतूद करण्यात आली आहे” असे नायरचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. “करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी नाकारण्याचे सुरु करताच सावध होऊन आम्ही स्त्रीरोग चिकित्सा विभागात बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांची जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी सिद्धता केली आहे” असंही डॉ. मोहन जोशी म्हणाले.

नायरमध्ये १४ एप्रिल ते २२ मे या काळात बाळंतपणासाठी १२६ करोनाबाधित महिला दाखल झाल्या असून त्यांनी १२९ बाळांना जन्म दिल्याचे डॉ. निरज महाजन यांनी सांगितले. यात एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला तर एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला. ज्या महिलेने तिळ्यांना जन्म दिला त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आसून आई व तिन्ही बाळ आता त्यांच्या घरी असल्याचे डॉ. महाजन म्हणाले.

“आमच्याकडे आलेल्या १२६ महिला या करोनाबाधित असल्या तरी जन्माला आलेल्या एकाही बाळाला करोनाची लागण झालेली नाही” असे डॉ. निरज महाजन यांनी सांगितले. “बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलांपैकी ३५ जणांची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली असून बहुतेक गर्भवती महिला या सहा-सात खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारल्यानंतर नायरमध्ये आल्या” डॉ. महाजन यांनी सांगितले. ११० खाटांच्या आमच्या विभागात वीस निवासी डॉक्टर असून तेच आमचे खरे हिरो असल्याचे डॉ. महाजन यांनी आवर्जून सांगितले. जन्माला आलेल्या सर्व बाळांना आईचे दूध लगेचच सुरु केले असून त्यातूनच या बाळांना खरी प्रतिकारशक्ती मिळणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

नायर रुग्णालयाचे संपूर्ण करोना रुग्णालयात रुपांतर करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून रुग्णालयातील एकूण १२०० खाटांपैकी ९०० खाटांचे करोना रुग्णांसाठी रुपांतर करण्यात आले असून अतिदक्षता विभागात सध्या ५५ खाटा असल्याचेही डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. नायर रुग्णालयाप्रमाणेच काही दिवसांपूर्वी पालिकेच्या शीव रुग्णालयातील स्त्रीरोग चिकित्सा विभागात शंभर बाळांचा जन्म झाला असून शीव असो की नायर रुग्णालय असो जन्माला येणाऱ्या बाळांसाठी व त्यांच्या मातांसाठी मातृतूल्य कवचकुंडले बनली आहेत.