07 July 2020

News Flash

मुंबईत १२७६ नवे करोनाबाधित

४९ रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा १४१७ झाला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत बुधवारी करोनाच्या आणखी १२७६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा ४३,२६२ वर गेला आहे. तर ४९ रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा १४१७ झाला आहे. तर आणखी ७९५ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, २५९ रुग्णांना बुधवारी घरी पाठवण्यात आले. आतापर्यंत १७,४७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २४,३७३ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण ४९ मृतांपैकी ३६ जणांना दीर्घकालीन आजार होते, तर १३ रुग्णांचा करोनाने बळी गेला आहे. मृतांमध्ये २७ पुरुष आणि २२ महिला होत्या. २७ मृतांचे वय ६०च्या वर होते.

अग्निशमन दलातील पाचवा बळी

कुर्ला अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा करोनामुळे बळी गेला आहे. नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलातील कर्मचारी मोठय़ा संख्येने बाधित झाले असून आतापर्यंत पाच बळी गेले आहेत.

धारावीत १८३९ रुग्ण

मुंबई महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील धारावी परिसरात बुधवारी १९ जणांना करोनाची बाधा झाली असून या परिसरातील करोनाबाधितांची संख्या १८३९ झाली आहे. मात्र त्याच वेळी माहीम परिसरातील रुग्णसंख्येत २५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे माहीममधील करोनाबाधितांची संख्या ५७४ वर पोहोचली आहे. तर दादरमधील १० जणांना करोनाची बाधा झाली असून दादरमधील रुग्णसंख्या ३४७ झाली आहे.

आजपासून रुग्ण दाखल होणार

वादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे— कुर्ला संकुलातील करोनाग्रस्तांसाठीच्या तात्पूरत्या रुग्णालयातील करोनाग्रस्तांना मंगळवारी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. मात्र मुंबईत झालेल्या पावसात हे रुग्णालय जलमय झाले नसल्याने तेथे गुरुवारी संध्याकाळपासून  रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पोलीस दलातील मृत्युसत्र सुरूच

वर्षभर कर्करोगाशी झुंजणाऱ्या कुर्ला पोलीस ठाण्याच्या अंमलदाराचा बुधवारी करोना संसर्गाने मृत्यू झाला. कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अंमलदार वर्षभरापासून वैद्यकीय कारणांमुळे रजेवर होते. त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील नामांकित रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना करोना संसर्गाची लागण झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील १९ तर राज्य पोलीस दलातील २९ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाबाधित १५२६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात २३ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभरामध्ये २३ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३०९ वर पोहोचली आहे. तर, जिल्ह्य़ात ४२२ नवे करोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या ९ हजार ४८३ इतकी झाली आहे. जिल्ह्य़ात बुधवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मीरा-भाईंदरमधील ८, ठाण्यातील ५, उल्हासनगरमधील ५, नवी मुंबईतील २, अंबरनाथमधील २ आणि कल्याणमधील १ रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी ठाणे शहरातील १४९, नवी मुंबईतील ९६, कल्याण-डोंबिवली शहरातील ६२, भिवंडी शहरातील १२, अंबरनाथ  ६, उल्हासनगर  १५, बदलापूर  २९, मीरा-भाईंदर  ४३ आणि ठाणे ग्रामीण मध्ये १० रुग्ण वाढले.

पनवेल तालुक्यात २१ नवे रुग्ण

तालुक्यामध्ये बुधवारी २१ नवे करोनाबाधित आढळले असून कामोठे येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या रुग्णाला यापूर्वी न्युमोनियाचा त्रास असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. पनवेल पालिका क्षेत्रात १५ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण बुधवारी आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 12:28 am

Web Title: 1276 new corona affected in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणार
2 ‘निसर्ग’ संकट टळले!
3 ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये आज पर्यावरणावर मंथन
Just Now!
X