मुंबईत गुरुवारी १,२८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण बाधितांचा आकडा ८८ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या ४८ तासांत ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ५,१२९ वर पोहोचली आहे. तर मृत्युदर ५.७ इतका झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज १.४९ टक्के रुग्णवाढ होत आहे. मंगळवारी १,२८२ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८८,७९५ वर गेली आहे. गुरुवारी ५१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ५९,७५१ म्हणजेच ६७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २३,९१५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ८२० संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर अतिजोखमीचे ८१३८ संपर्क शोधण्यात आले आहेत.

गुरुवारी मृत झालेल्या ६८ रुग्णांमध्ये केवळ २७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ४१ रुग्णांना कोणतेही आजार नव्हते. आतापर्यंत मृत पावलेल्या एकूण रुग्णांपैकी ४०७६ रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त होते. दाखल रुग्णांपैकी १०५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

राज्यातील स्थिती : गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ६,८७५ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. राज्यात करोनामुळे आणखी २१९ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा ९,६६७ वर पोहोचला आहे.

६,६३४ इमारती ‘टाळेबंद’

* मुंबईत सध्या झोपडपट्टीतील संसर्ग आटोक्यात आला असून इमारती, उच्चभ्रू गृहनिर्माण संकुले यामध्ये प्रमाण वाढले आहे.

* झोपडपट्टय़ांमधील ७४६ भाग प्रतिबंधित करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त क्षेत्र कुर्ला, भांडुप, देवनार-मानखुर्द, मुलुंड परिसरातील आहेत.

* तब्बल ६,६३४ इमारती टाळेबंद आहेत. त्यातील ३.३ लाख घरे आणि ११ लाख रहिवासी सध्या टाळेबंदीत आहेत. यात सर्वाधिक अंधेरी, बोरिवली, मुलुंड, वडाळा, कांदिवली, मालाड, घाटकोपर परिसरातील इमारती आहेत.