प्रथमच मराठा आणि आर्थिक दुर्बलांना देण्यात आलेल्या आरक्षणामुळे खुल्या जागा कमी झाल्या असतानाच बारावीचा निकाल यंदा रोडावूनही प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा खुल्या गटाचा ‘कट ऑफ’ गेल्या वर्षीच्या तुलनेत वधारला आहे.

बारावीचा निकालाचा टक्का यंदा सुमारे साडेतीन टक्क्यांनी घसरल्याने आणि विशेष प्रावीण्य, त्यातही ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने ‘कट ऑफ’ खाली येईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. परंतु, १६ टक्के मराठा (एसईबीसी) आणि १० टक्के आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटाला (ईडब्ल्यूएस) देण्यात आलेल्या आरक्षणामुळे यंदा खुल्या वर्गातील जागा कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाचे विद्यार्थीही पदवीकरिता मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रवेशाकरिता येतात. राज्य शिक्षण मंडळाच्या तुलनेत या मंडळांचा निकाल चांगला लागत असल्याने त्याचाही परिणाम ‘कट ऑफ’वर होतो. परिणामी यंदा खुल्या वर्गाचा ‘कट ऑफ’ गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा वाढला आहे. काही ठरावीक अभ्यासक्रमांमध्येच ‘कट ऑफ’ गेल्या वर्षीच्या तुलनेत खाली आला आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न सुमारे ७०० हून अधिक महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांची पहिली प्रवेश यादी महाविद्यालयांनी सोमवारी सायंकाळी जाहीर केली. काही महाविद्यालयांच्या गेल्या वर्षीच्या पहिल्या प्रवेश यादीशी तुलना केली असता यंदा ‘कट ऑफ’ एक ते चार टक्क्यांनी वाढला आहे. विविध आरक्षणांमुळे खुल्या वर्गाच्या जागा कमी होऊन ‘कट ऑफ’ वाढल्याचे माजी प्राचार्य टी. ए. शिवारे यांनी सांगितले.

उदाहरणार्थ माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात कला शाखेचा ‘कट ऑफ’ गेल्या वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी वाढला आहे. तर काही ठिकाणी तो साधारणपणे तितकाच किंवा किंचित कमी झाला आहे.

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाकरिता यंदा २ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी एकूण ७ लाख ८४ हजार अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या अनुक्रमे २ लाख ७५ हजार आणि ८ लाख ५५ हजार इतकी होती. या यादीतील विद्यार्थ्यांना १८ ते २० जून (दुपारी २ वाजेपर्यंत) दरम्यान आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित करायचे आहेत. त्यानंतर दुसरी यादी २० जूनला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल.