‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे फेब्रुवारी, २०१६मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु, यंदा १० ते १२ दिवस आधीच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या वर्षी दहावीप्रमाणे बारावीच्या अनुत्तीर्ण तसेच काही कारणांमुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांकरिता ऑक्टोबर महिन्याऐवजी जुलै-ऑगस्टमध्येच पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये हे कारण त्या मागे आहे. मात्र, त्यासाठी बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आणखी अलीकडे आणणे गरजेचे होते. त्यानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ातच बारावीचा निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.